कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २६२३९९ ग्राहकांना पुनर्जोडणीची संधी! विलासराव देशमुख अभय योजना ; ६ हप्त्यांत थकबाकी भरुन मिळणार दंड-व्याजाची माफी!
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती परिमंडलात २६२३९९ कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे २८७ कोटी थकबाकी आहे. त्यातील ३९ कोटी ४६ लाखांची माफी मिळणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफीसह, थकबाकीत ६ सुलभ हप्त्याची सोय करून पुनर्जोडणीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
३१ डिसेंबर २०२१ पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असलेल्या सर्व लघु व उच्चदाब वीजग्राहकांकरीता (कृषी धोरण २०२० सुरू असल्याने कृषी ग्राहक वगळून ) ही योजना लागू आहे.
कोविड -१९ चा प्रादुर्भाव व टाळेबंदी यांचा परिणाम आर्थिक चक्रावर झाल्याने अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झाला. आता कोरोनातून बाहेर पडल्यानंतर वीजजोडणी पुन्हा सुरु करायची आहे. मात्र, इच्छा असूनही फुगलेली थकबाकी अडसर होती. ही बाब ध्यानात घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री मा. ना. डॉ. नितीन राऊत यांनी कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणून अर्थचक्राला गती देण्याचे हेतूने विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा केली आहे.
विलासराव देशमुख अभय योजनेचा कालावधी १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व लघु व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ग्राहकांना मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येईल.
थकबाकीदार ग्राहकांनी मुळ थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकीत मूळ रकमेत अधिकची सवलत मिळेल. ग्राहकांना सुलभ हप्त्यांने थकीत रक्कम भरावयाची असल्यास मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे. या हप्त्यांना व्याज लागणार नाही.
बारामती परिमंडलातील पात्र लाभार्थी संख्या –
परिमंडलांतर्गत बारामती मंडलात ६५५९६ ग्राहक पात्र असून त्यांच्याकडे ११० कोटी थकबाकी व १५ कोटी दंड-व्याज आहे. सातारा मंडलात ५०३२५ ग्राहकांकडे ३९ कोटी थकबाकी व ५ कोटी ६२ लाख दंड-व्याज आहे. तर सोलापूर मंडलातील पात्र १४६३४१ ग्राहकांकडे ९० कोटी थकबाकी तर १३ कोटी ८ लाख रुपये दंड-व्याजापोटी थकलेले आहेत.
सहा सुलभ हप्त्यांत थकबाकी भरा
सदरच्या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना नव्याने वीजजोडणी मिळेल. त्याकरिता नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क व अनामत रक्कम भरावी लागेल. वीजजोडणी पुर्ववत झाल्यानंतर चालू वीज बिल व मुळ थकबाकीचे हप्ते नियमित भरणे अनिवार्य असेल. लाभार्थी ग्राहकाने उर्वरित हप्त्यांची रक्कम विहीत मुदतीत भरली नाही तर माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होईल.
न्यायालयीन दावा असल्यास काय कराल?
महावितरणने थकबाकीच्या रक्कम वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल केला असल्यास संबंधित ग्राहकास या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च ) देणे आवश्यक राहिल. तसेच ज्या न्यायालयीन प्रकरणी डिक्री मंजूर झाली होती व त्याला १२ वर्षे उलटूनही त्यावर काहीही कारवाई झालेली नाही व त्यांनी पुढे अपीलही केलेले नाही यातील ग्राहकांनाही अभय योजनेचा लाभ मिळेल. तर ज्या डिक्री प्रकरणांना १२ वर्षे पूर्ण झालेली नाहीत त्यांना व्याजावर एकरकमी ५० टक्केच माफी मिळेल.
अर्ज कोठे करायचा?
महावितरण http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ग्राहक पोर्टलमधून विलासराव देशमुख अभय योजनेसाठी अर्ज करण्याची सोय आहे. ऑनलाईन अर्जाची पडताळणी तत्सम उपविभाग किंवा मंडल कार्यालयाकडून होईल. पात्र ग्राहकांना २०० रूपयांच्या मुद्रांकासह अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी.