भवानीनगर : येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आता केवळ मतदार यादी प्रसिध्द झाली असली तरी विरोधकांनी रणशिंग फुंकले असून छत्रपती बचाव ची हाक देत कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मतदारांना भावनिक साद घालत निवडणूकीची तयारी केली आहे.
छत्रपती कारखान्याची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. तत्पूर्वीच सध्या कारखान्याच्या निवडणूकीचे रणकंदन सुरू झाले आहे, त्याला कारणही असेच आहे, यावर्षीचा गळीत हंगाम कारखान्यासाठी जिकीरीचा ठरला असून यावर्षी अपुरी ऊस तोडणी यंत्रणा आल्याने उसाची तोडणी व वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. अधिकाऱ्यांमधील सुसंवादाचा अभाव व कार्यक्षमतेने काम करण्यात प्रशासन कमी पडल्याने सध्या कारखान्याचा हंगाम रडतखडत सुरू आहे. कामगारांचे मासिक वेतनही रखडल्याने परिसरात नाराजीपेक्षा कारखान्याविषयी चिंतेचे वातावरण अधिक आहे, अशा स्थितीत गेली वीस वर्षांहून अधिक काळापासून कारखाना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील राहीलेल्या विरोधकांना यंदाची निवडणूक तुलनेने सोपी जाण्याची चिन्हे आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार, इंदापूरला राज्यमंत्रीपद असले व बिगर ऊस उत्पादकांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला असला तरी देखील सभासदांमधून असलेला विरोधाचा सूर येणाऱ्या काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती कारखान्याची स्थिती सध्याच्या काळात बिकट होत चालल्याने कारखाना बचावचा नारा देत सभासदांच्या चिंतेला आश्वासक नेतृत्वाची फुंकर देण्याचे काम करीत पृथ्वीराज जाचक यांनी पुन्हा एकदा लढ्याला सुरवात केली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली ही मोहिम राष्ट्रवादी समर्थकांनाही त्यांच्याकडे आकर्षित करणारी ठरली असून जाचक यांच्याच नेतृत्वात कारखाना पुन्हा स्थिरस्थावर होऊ शकतो असा विश्वास असलेल्या युवा पिढी व ज्येष्ठांनी जाचक यांच्या पाठीशी समर्थन उभे करायला सुरवात केली आहे. गावागावातून असे कार्यकर्ते सध्या कारखान्याची परिस्थिती सभासदांपुढे मांडत असून आता कसल्याही स्थितीत कारखान्यात सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन ते करीत आहेत. आमदारकी, खासदारकीला भलेही आपण आपल्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहू, मात्र छत्रपतीच्या बाबतीत राजकारण नको, जर माळेगावचे सभासद राजकीय निवडणूकीत रंजन तावरे यांना नाकारत असतील, मात्र कारखान्याच्या बाबतीत फक्त त्यांच्यावरच विश्वास ठेवत असतील तर छत्रपतीही त्याला अपवाद राहता कामा नये, राजकारणातील नेते व आदरस्थान वेगळे असेल, मात्र प्रपंचाच्या चुलीला तसाच आश्वासक चेहरा हवा असे सांगत युवा पिढीने आता कारखान्यात सत्ता परिवर्तनाचे संकेत देण्यास व जाचक यांच्या पाठीशी आपले बळ उभे करण्यास सुरवात केली आहे. येणाऱ्या काळात छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आरोप-प्रत्यारोपाची राळ उठण्याची चिन्हे आहेत.










