बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, यामध्ये एक जण कोरोनाग्रस्त, एक जण सारीचा रुग्ण होता तर तिसरा रुग्ण हा त्यांच्या कुटुंबामध्ये कोरोना चा रुग्ण असलेला परंतु इतर आजार असलेला होता.
बारामती रात्रीपासून झालेल्या या तीन मृत्युने हादरली. बारामतीत तपासणी होऊन निश्चित झालेल्या एका कोरोनाग्रस्ताचे आज सकाळी निधन झाले. व्यवसायाने औषध विक्रेता असलेल्या या कोरोनाग्रस्तावर बारामतीतील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावत जाऊन ते उपचाराला प्रतिसाद देण्याचे प्रमाण कमी झाले व आज त्यांचा दुर्दैवी अंत झाला. समर्थ नगर गुणवडी येथील एका जेष्ठ संशयित कोरोनाग्रस्ताचा पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबात कोरोनाग्रस्त आढळल्याने त्यांचा अंत्यविधी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान सोमेश्वरनगर येथील सारीच्या रुग्णावर बारामतीत उपचार सुरू होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता, परंतु त्यांना सारी ची लागण झाली होती. त्यांचे रात्री निधन झाले.
अशा कोव्हिड योध्द्यांना सलाम…
बारामतीत आजपर्यंत कोरोना व कोरोना संशयितांचे 13 जणांचे बळी गेले आहेत. या सर्वांचे अंत्यसंस्कार त्यांच्या नातेवाईकांच्याशिवाय करण्याची जबाबदारी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजतागायत अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा व ज्यांना सलाम करावा अशी कामगिरी बारामती नगरपालिकेचे कर्मचारी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून बारामतीत करत आहेत. इमानेइतबारे अंत्यविधीचे काम करणारे हे सर्व कर्मचारी सध्या बारामतीच्या कौतुकाचा विषय बनले आहेत.











