बॅंकेतून खोटे फोन करून पैसे लुटीच्या जामतारा चे काय आहे गौडबंगाल?
महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
झारखंड राज्यातील जामतारा पोलिसांनी टिंकू मंडल या सायबर आरोपीला जामतारातूनच ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली, तेव्हा पोलिसदेखील चक्रावून गेले. अगदीच मामुली शिक्षण झालेल्या या ठगाने अब्जावधी रुपये कमावल्याचे कळाल्यावर पोलिसांचे डोळे विस्फारले. कोट्यवधींचे बंगले, कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी कार पाहिल्यावर पोलिस चक्रावून गेले.. आणि जामतारा चर्चेत आले..जामतारा आहे काय? तर जामतारा हे एक गाव आहे, झारखंड जिल्ह्यातील..जिथे बंगाली, संताली व हिंदी भाषा बोलल्या जातात..मात्र या गावातील सर्वजणच कोट्यधीश आहेत आणि ते दुसऱ्यांच्या पैशावर…!
सध्या जामतारा नावाची वेबसिरीज सुरू आहे. सौमेंद्र पढी यांनी दिग्दर्शित केलेली त्रिशांत श्रीवास्तव यांनी लिहीलेली जामतारा ही वेबसिरीज सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतेय.. या वेबसिरीजने संपूर्ण देशातील सामान्यांनाही हादरवणारे एक सत्य समोर मांडलंय…कोणाची तरी आपत्ती या गावातील कोणासाठी तरी इष्टापत्ती ठरते आणि अगदी काही क्षणात बॅंकेतील पैसे गायब करण्याची कला येथील लोकांकडून साधली जाते, असे हे गाव जामतारा..!
कधी तुम्हाला एटीएम च्या हेडक्वार्टर किंवा पेटीएम किंवा फोन पे अथवा एसबीई की मेन ब्रांच मधून बोलतोय असे फोन आलेत?…ज्यांना ते आलेत, त्यांच्यापैकी कैक जण फसले गेलेत..हातोहात नाही, अगदी क्षणात बॅंकेच्या खात्यातून त्यांचे हजारो, लाखो रुपये काढले गेलेत…त्यामुळेच यापुढील काळात जर असा कोणता कॉल तुमच्या फोनवर आला, तर जरूर विचारा की, काय तुम्ही जामतारा मधून बोलताय का?
झारखंड जिल्ह्यातील तसं पाहिलं तर एक शांत, छोटसं गाव आहे जामतारा गाव.. हे गाव जंगलाला खेटून असल्याने ही नैसर्गिक रचना या गावकऱ्यांसाठी उत्पन्नाचे व लपण्याचे खूप चांगले साधन बनली. तसे पाहिल्यास एक दुर्गम गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाला आता तंत्रज्ञानातील माहितदार गाव म्हणून ओळखले जाते. येथील नजिकच्या मोबाईल टॉवरवर दररोज हजारो फोन नोंदले जातात. त्यातील जवळपास सर्व फोन हे असेच कोणाची तरी फसवणूक करण्यासाठी केलेले असतात.
सिताराम मंडल व टिंकू मंडल या भावांनी सुरू केलेल्या या व्यवसायात आता इथे घराघरात सायबर क्राईम करणारी मुले तयार झाली आहेत. फक्त मुलेच नाही, महिलाही यात सहभागी आहेत, म्हणजे कुटुंबातील सर्वच जण हा गुन्हा पुन्हा पुन्हा करतात.
हा एक बिझनेस आहे, दुसऱ्यांना लुटण्याचा…विशेषतः सायबरमध्ये अप्रगत,अशिक्षित असलेल्यांना लुटण्याचा हा व्यवसाय आहे. या व्यवसायाासाठी फार काही लागत नाही. येथील बहुतेकांकडे हजारो बोगस मोबाईलची सीम कार्ड असतात. ती कोठून मिळवलेली असतात हे अजूनपर्यंत न लागलेला शोध आहे. या बोगस कार्डवरून ही लोकं देशभरात फोन कॉल्स करीत असतात. एसबीआय मधून बोलतोय म्हटले की, अनेकांचा पूर्वी विश्वास बसायचा. आता पध्दत बदलली आहे. आता फोनपे, पेटीएम मधून बोलतो असे सांगत लूट केली जाते. मोबाईलचा ओटीपी नंबर मिळाला की यांचे काम भागते आणि इकडे बॅंक खात्यातील रक्कम मोकळी होते.
सन २०१६ पासून याचे गुन्हे दाखल झाले आणि पोलिसांना या आगळ्यावेगळ्या व्यवसायाचा छडा लागला. मग पोलिसांच्या भीतीने ही पोरं जंगलात लपून आपला खेळ सुरू ठेवू लागली. खेळ अजूनही सुरूच आहे. ना पोलिसांच्या भीतीने थांबलाय, ना कधी पकडले म्हणून जप्त केलेल्या संपत्तीने..!
विशेष म्हणजे या गावात अपवाद वगळता सारेच हा धंदा करतात. बिगरभांडवली धंद्यातून दिवसाला कधी काही हजार तर कधी काही लाखही मिळून जातात. त्यामुळे आलिशान बंगले, गाड्या व जीवनशैली येथे दिसते. अल्पावधीतच श्रीमंत नव्हे गर्भश्रीमंत झालेले गाव म्हणून या गावाची भोवताली ओळख निर्माण झालेली आहे.










