प्रांताधिकाऱ्यांची आपत्कालीन उपाययोजना
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग व कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे प्रशासनही चिंतेत आहे. त्यातच शहरातील कोविड केअर सेंटरमधील गर्दी आता आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अखेरचा उपाय म्हणून शहरातील अत्याधुनिक सुविधा असलेली खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे, त्यााचाच एक भाग म्हणून शहरातील तीन मोठी खासगी रुग्णालये कोविड रुग्णालये केली जाणार आहेत.
प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी प्रशासनला आज यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार रूग्णांच्या उपचारासाठी आता काही दिवसांतच दौंड शहरातील पिरॅमिड, योगेश्वरी व महालक्ष्मी हे तीन खासगी रुग्णालये डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर होणार आहेत.
सध्या कोरोना बाधीत रूग्णांची तपासणी व प्राथमिक उपचार करण्यासाठी दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागासाठी यवत व स्वामी चिंचोली अशी तीन कोवीड केअर सेंटर तालुक्यात उभी केली आहेत, मात्र सध्या दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे, यामध्ये कौटुंबिक संपर्कातील कोरोना बाधीत रूग्ण अधिक संख्येने सापडत आहेत.
कोरोना चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी कोरोनाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे, कोरोना बाधीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे, याकरिता उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दौंड तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन ती नियंत्रित आणण्यासाठी शहरातील तीन खासगी रूग्णालये कोरोना रुग्णालये करून विलगीकरणासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुविधेसह खाटांची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान याबाबत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले की, संबंधित तीन खासगी रूग्णालये अधिकृत करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली या खासगी रुग्णालयात ८० टक्के कोरोना बाधीत रूग्णांची योग्य ती व्यवस्था करण्यात येणार आहे महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्पातील रूग्णांची उपचार करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या खासगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होईल.











