नानाची टांग
मा. शिक्षणमंत्री महोदया
यांस आदरपूर्वक नमस्कार,
आदरणीय मंत्रीमहोदय, मी आमच्या पिंट्याची आई हे पत्र लिहीतेय, तसं ते पत्र फक्त तुम्हालाच नाही, सगळ्या मंत्रीमंडळासाठीच आहे, पण त्या कोरोनामुळे पैसे पण नाहीत स्वतंत्र टपालं टाकायला आणि तसंही पोस्टात पण उभं राहू देत नाहीत, म्हणून एकट्या तुम्हालाच हे पत्र.
आता तुम्ही म्हणाल की, का म्हणून मी पत्र लिहायला बसले? आता काय पत्राचा जमाना राहीलाय का? खरंय ताई, जमाना असा आलाय की, पार आम्ही सगळे झूम, मिटींग अॅप हाताळायला लागलो, त्यामुळे आम्ही फारच फॉरवर्ड झालोत. मग मेल करायची सोडून पत्र का लिहीतेय? तर आमचा पिंट्या आहे ना, तो आहे सहावीत आणि आमचा सोन्या दुसरीत.. ! सोन्या शिकतो झेडपीच्या शाळेत आणि पिंट्या शिकतो इंग्रजी शाळेत..!
तर मी काय म्हणत होते, मी पत्र अशासाठी लिहीलेय की, मुख्यमंत्री साहेब त्या दिवशी नाही का म्हणाले, शाळा थांबल्यात, पण शिक्षण थांबले नाही पाहिजे, नव्हे शिक्षण सुरूच राहीले पाहिजे, तसेही आपण शिक्षण सुरू करीतच आहोत..म्हणजे शिक्षण सुरूच राहणार आहे..नव्हे ते सुरूच राहील..आणि तसेही ते सुरूच राहीले पाहिजे…बराच वेळ त्यांची गाडी यावर अडली होती. त्यातून आम्हाला फक्त एवढेच कळले की, आता ऑनलाईन शिक्षण घेतले पाहिजे बस्स..
तर आम्ही आता ते सुरू केलंय..पण जरा प्रॉब्लेमच झालेत..म्हणजे बघा..आमच्या घरात एकच स्मार्ट फोन आहे..आणि शाळेत दोघे..! पिंट्याचा एनव्हायर्नमेंटल स्टडीजचा क्लास सुरू होतो अकरा वाजता…आणि सोन्याचा मराठीचा क्लास सुरू होतो..अकरा वाजून दहा मिनीटांनी..! मग पिंट्याची मॅथेमेटीक्सवाली बाई बरोबर बारा वाजता जागी होते..आणि सोन्याचा गणिताचा मास्तर जांभई देत ञनलाईन येतो बारा वाजून वीस मिनीटांनी..! सांगा आम्ही शिकायचं कसं?
आणखी एक… आम्ही राहतो चित्तरवाडी गावात…आमच्या घरी सकाळी सकाळी पाणी येत नाही म्हणून आम्ही एकदा ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जाब विचारला होता की, आम्हाला पाणी पुरेसं का येत नाही म्हणून! तर सरपंच म्हणाले की, तुम्ही टेकाडावर राहता…मग टाकीतील पाणी पुरेशा दाबानं तुमच्यापर्यंत पोचत नाही…आणि आमचा पिंट्या असू दे नाही, तर सोन्या…मोबाईल घेऊन बसले आणि तुमची झूम मिटींग सुरू झाली की, थोड्या थोड्या वेळानं मिटींग तशीच स्टॅण्डबाय राहते आणि ते एक वर्तुळ येतं फक्त गरगर फिरतं…आम्ही पार वैतागून गेलोय…आम्ही परवा त्या मोबाईल कंपनीच्या माणसाला याचं कारण विचारलं तर त्यानं गावाचं नाव ऐकताच आमचं गाव खड्ड्यात असल्यामुळं तुम्हाला मोबाईलला रेंजच येत नाही असं सांगितलं…आता मला सांगा पाणी येत नाही, तर आम्ही टेकाडावर आणि रेंज येत नाही, तर आम्ही खड्ड्यात…आम्ही नेमकं कुठं आहे ते आम्हालाच कळत नाही बघा…
बरं ते जाऊ द्या..परवा शाळेतल्या बाईंनी केलेला होमवर्क मोबाईलवर पाठवायला सांगितला. लगेच पाठवला. थोड्याच वेळात बाईंचा थेट फोनच आला…म्हणाल्या, अहो, तुमच्या मुलाला काहीच येत नाही, त्याने ४५ नंतर थेट ६६ लिहीलंय..मी पण दचकले…आम्हाला असं शिकवलंच नव्हतं हो..मी वही घेतली, पाहिली तर खरंच की…४५ नंतर ६६ च लिहीलं होतं..बाई फोनवर होत्या..मी सोन्याला बोलावलं, बाईंदेखताच चांगलं खडसावलं…तर तो म्हणाला कसा? मम्मी बाईंनी असंच शिकवलंय…४५ नंतर त्या गायब झाल्या आणि जेव्हा त्यांचा धडा सुरू झाला तेव्हा त्या ६६ वर पोचल्या होत्या..मग मी ४५ नंतर ६६ लिहीलंय…मी बाईंना हे सांगितलं तर त्यांनी फोनच कट केला बघा…मला सांगा, आमचं काय चुकलं का?
दुसरं एक सांगायचं होतं…आता मोबाईलचं काय करायचं? आमचे हे म्हणजे गवंडीकाम करतात.. ते म्हणत होते, अजून काही दिवसांनी बांधकामं सुरू झाली की, दुसरा मोबाईल घेऊ…पण आता मोबाईलला पैसे नाहीत…आणि शाळा तर फी साठी एवढी मागं लागलीय की, बोलायचं कामच नाही…पण आता खरंच काम नाही हो…एक सांगू का…आम्ही स्वप्नांचे इमले बांधले…आमची घरची गरीबी..पण पोरं चांगल्या शाळेत शिकून पांग फेडतील असा मोठा विश्वास माझ्या मिस्टरांना…! आता ते गवंडीकाम करतेत, पण सुपारीच्या खांडाचं देखील त्यांना व्यसन नाही..मी पण बऱ्यापैकी शिकलेली आहे..पण परिस्थितीपुढे आम्ही दोघेही हतबल आहोत… मग आता शेवटचं सांगा की, आम्ही नवीन मोबाईल घेऊ की शाळेची फी भरू?
तेवढं सांगता का?
पिंट्याची आई











