युवराज जाधव, महान्यूज लाईव्ह
सांगली : माणूस माणसासाठी जीवापेक्षा अनमोल असतो…पण एक झाड देखील सर्व माणसांसाठी तेवढंच अनमोल असतं..हे भोसेकरांनी दाखवलं…एका झाडासाठी भोसेकरांनी दाखवलेल्या प्रेमाला अखेर न्याय मिळाला…राज्यापासून केंद्रापर्यंत लाभलेल्या राजाश्रयामुळे एक झाड वाचलं..आणि त्या झाडाशी जोडली गेलेली समस्त पांथिकांची नाळही..!
रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात भोसे (ता. मिरज) येथील ४०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड तोडले जाणार होते. या वडाच्या झाडाशेजारीच यल्लमा देवीचे मंदिर होते. लोकांच्या धार्मिक श्रध्दा लक्षात घेत हे मंदिर वाचले, मात्र झाड जाणार हे निश्चित होते, अशावेळीच पर्यावरणप्रेमी एकत्र आले. हे झाड केवळ पर्यावरणासाठीच महत्वाचे होते असे नाही, तर त्या झाडाशी अनेकांच्या श्रध्दा जोडल्या गेल्या होत्या, त्या श्रध्देपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करण्यात आली. त्यांनी याचे गांभिर्य लक्षात राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना तातडीने यात लक्ष घालण्याची सूचना केली. ठाकरे यांनाही गावकऱ्यांनी एका झाडासाठी दाखवलेले ममत्व भारी वाटले. त्यांनी गावकऱ्यांच्या या पर्यावरणप्रेमाला सलाम करीत केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले व यात लक्ष घालण्याची विनंती केली आणि गडकरी यांनी यास दाद देत लागलीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना यातून मार्ग काढण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूरचे कार्यकारी अभियंता संजय कदम, रत्नागिरी महामार्गाचे प्रमुख तिवारी, दिलीप बिल्डकॉनचे प्रकल्प प्रमुख श्री. दिक्षीत, आभाळमाया संस्थेचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, एम.एस. राजपूत, दिनेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठकीतून यावर तोडगा काढला. झाडापर्यंत सेवा रस्ता काढून तिथेच थांबवायचा, असाही तो तिथपर्यंतच उपयोगी होता, त्यातून जे साध्य साधायचे होते, तेही साधेल व झाडही वाचेल असा तोडगा यातून काढण्यात आला आणि झाड वाचविण्यावर एकमत झाले.
खरोखरच एकीकडे राज्य कोरोनाच्या भयंकर महामारीत पिचले असतानाही गावकऱ्यांनी आपला पर्यावरण संतुलनाचा हेका काही सोडला नाही आणि ही अनोखी घटना राज्यात चर्चिली जात असतानाच विकासाच्या दूतांनीही त्याची बूज राखत एका-एका झाडाचे महत्व राज्यापुढे अधोरेखित केले.












Great GREEN and Grand
Excellent coverage
Thanx n Regards