नानाची टांग
बाबुराव.. घरी श्रीमंती नसली तरी मनाचा गर्भश्रीमंत माणूस…गावात, वाडीवस्तीवर कोणी आजारी पडू दे..कोणाचा पोलिस ठाण्याचा मॅटर असू दे..कोणाचं लग्न जमवायचं असू दे, नाहीतर कोणाच्या मयतीचा प्रसंग असू दे..बाबुराव पुढे हजर असणारच… बरं या मदतीत त्याला कधी आपण काहीतरी वेगळं करतोय असं कधी वाटलंच नाही. आपण सर्वांना मदत करतोय, मग आपण निवडणूकीला उभं राहावं हे देखील त्याच्या मनाला कधी शिवलं नाही..असा बाबुराव म्हणजे अख्ख्या गावाचा बाब्या..पण यंदा मात्र जरा आक्रीतच घडलं..!
बाबुरावच्या घरासमोर राज्य शासनाची १०८ अॅम्बुलन्स अचानक आज सकाळी-सकाळी थांबली. तिचा करकचून टाकलेला ब्रेक साऱ्या वस्तीला जागं करायला पुरेसा ठरला. गाडीतून आकाशी रंगाची प्लास्टीकची कपडे घातलेली तोंड, बिंड पॅक बांधलेली माणसं उतरली. बाबुरावच्या घराचा पत्ता विचारला..आणि थेट बाबुरावच्या घरापुढे जाऊन बाबुरावला हाक मारली..कुत्री भुंकायला लागली. अंगणात खेळणारी लहानगी पोरं भयचकीत होऊन घरात दडली. घरातली माणसं हबकून गेली..बायाबापड्या पदर तोंडावर घेऊन दाराच्या आडून हळूच बघू लागल्या.. सकाळी सकाळी दोन कोरा भाकरी खाणारा बाब्या तोंडात तसाच घास आणि तोंडाचा ऑ करीत बाहेर आला. प्लास्टीकच्या कपड्यावाल्यांनी त्याला हळूच काहीतरी सांगितलं आणि थेट उचलून गाडीत घातला…घरातली बायापोरं रडायला लागली. साऱ्या वस्तीवर पळापळ झाली. कोणालाच काही सुधरेना..काही वेळातच बाब्याला कोरोना झाल्याची आवई उठली.. रानात खुरपायला येणाऱ्या बायकांनी पोबारा केला. ज्यांची मदतीची कामं होती, ती काही फिरकलीच नाहीत. कोरोनाची आवई गावात पोचली. सरपंच कडक कापडं घालून बुलेटवरून सवारी करीत गावात नुकतंच आलेलं…बातमी कळताच जणू फार मोठं संकट गावावर आलंय आणि केवळ आणि केवळ आपणच तारणहार आहोत, असं वाटून त्यानं थांबल्या जाग्यावरूनच हाळी दिली…गाव लॉकडाऊन..! अर्ध्या तासात तर जिकडं तिकडं मंडपवाल्याकडं असत्यात तशी लोखंडी बॅरिकेट रस्त्याच्या मधोमध उभी राहीली..बाहेर गेलेले आत नाहीत आणि आतले आता बाहेर जाणार नाहीत अशी पक्की बांधबंदिस्ती केल्यावरच सरपंचानं श्वास घेतला..बाबुरावला कोरोना झालाय, म्हणता ज्यांनी त्याच्या शेतात मशागत केली, ज्यांनी औषधे उधार दिली, ज्यांनी उसने पैसे दिले होते, त्या साऱ्यांनीच बाबुरावच्या घरच्यांना लागलीच फोन करायला सुरवात केली. आमचे एवढे पैसे आहेत, कधी देणार वगैरे…त्यांना तोंड देता देता बाबुरावची बायको रखमा पार हवालदिल झाली. शेवटी-शेवटी अहो, अजून माझं मालक जिवंत हायेत, तुम्ही काळजी करू नगासा, वावार विकून पैसं देऊ, मग तर झालं? असा शेवटचा फोन ठेवून तिनं फोनच स्विच ऑफ करून टाकला.
इकडं बाबुरावला तालुक्याच्या तपासणी सेंटरला नेलं. बाहेरच्या पारावर बाबुराव बसला…दवाखान्यातली माणसं अजून यायची होती… बाबुराव सगळ्यांना निरखत होता.. आजवर प्रत्येक कामात छाती काढून तोऱ्यात मिरवणारा, प्रत्येकाला मदतीसाठी पुढे धावून येणारा बाबुराव आज एकटाच बसला होता. त्याच्याकडं पाहून अगदी क्षुद्रपणाचा अनुभव देणाऱ्या नजरा तो पहिल्यांदाच अनुभवत होता आणि आपण काहीतरी मोठं पाप केलंय असं वाटून तो पण मान खाली घालून बसला होता.
थोड्या वेळानं सिस्टर आल्या. त्यांनी नाव पुकारलं. बाबुराव गेला..माहिती विचारली..बाबुरावनं आपण एवढ्यात कुठं बाहेर गेलोच नव्हतो असं सांगितलं. ..रानातल्या वस्तीवरून पुणं सोडाच, गावात देखील गेलो नाही, फार फार तर रानात फेरफटका मारायला अन सकाळच्या पारी सकाळची कामं उरकायला रानात गेल्याचं तो अगदी कळवळून सांगत होता. तेव्हा एका डॉक्टरनं त्याचा गैरसमज काढला.. डॉक्टरने दिलेली माहिती ऐकून बाबुराव सर्दच झाला. ही माहिती होती अशी, पाच-सहा दिवसांपूर्वी बाबुरावकडं शेजारच्या गावातील डाळींब-केळी खरेदी करणारा एक व्यापारी त्याचं काम घेऊन आला होता. त्याची थोडी अडचण होती, अर्धा-एक तास तो तिथं थांबला होता. त्याचं पुरतं समाधान बाब्यानं केल्यानंतर तो तिथून गेला होता. तो व्यापारी पुण्या-मुंबईला येत-जात असल्यानं त्याला कोरोना झाला. त्याच्या संपर्कातल्यांची शोधाशोध सुरू होती. त्यासाठी आरोग्य व महसूल विभागाने हाय़टेक यंत्रणा कामाला लावली होती. त्या व्यापाऱ्याचा मोबाईल तपासला. त्याचं जीमेलचं अकाऊंट होतं.. त्या अकाऊंटवरून ट्रॅफीक कंट्रोल तपासला. गेल्या पंधरा दिवसांत तो कुठं कुठं फिरला, कोणाजवळ बसला.. याची इत्थ्यंभूत माहिती त्यातून मिळाली. योगायोगाने बाबुरावचा मोबाईल नंबर नेमका त्या व्यापाऱ्याच्या मोबाईल नंबरजवळ अर्धा तासाच्या कालावधीपर्यंत तीन फुटापेक्षा जवळ होता हे दिसून आले आणि आऱोग्य खाते त्याच्यापर्यंत पोचले.. हे सगळे ऐकून बाबुराव सर्दच झाला. कोरोना होण्यापेक्षा त्याला या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगची जाम भीती वाटली.
बाबुरावनं त्या दवाखान्याच्या बाहेरच एका बाजूला खोली होती, त्यात काचेच्या आतमध्ये एक बाई होती, तिने काचेला जोडलेल्या रबरी हातात तिचा स्वतःचा हात घातला. बाबुरावला समोर बसायची खूण केली. बाबुरावनं तोंडाचा ऑ केला. मग पुन्हा मोठा ऑ केला.. त्या बाईने त्याच्या घशात एक पट्टी घातली. त्यातून त्याची लाळ बाहेर काढली. एका ट्यूबमध्ये भरली आणि झालं काम अशी खूण केली. बाबुराव पुन्हा झा़डाच्या पाराजवळ जाऊन बसला. थोड्या वेळाने डॉक्टरांनी काही अंतरावर येऊन बाबुरावला घरून काही आणलंय का? असं विचारलं. घरी क्वारंटाईन होणार का? असं विचारल्यावर नेमकं काय करायचं? असं अगदी निरागसपणे प्रतिप्रश्न केला. डॉक्टरांनी त्यास तुम्ही लो रिस्कमधले आहात, तरीदेखील हा कोरोना लहान मुले व मोठ्या माणसांसाठी जीवघेणा आहे, तुम्ही जर पॉझिटिव्ह निघालात तर तुम्हाला येथेच यावं लागेल, मात्र परवा याचा रिपोर्ट येईल, इथं खरोखरच पॉझिटिव्ह लोक आहेत, त्यापेक्षा घरातल्या लोकांपासून दूर रहा, आम्ही कळवतो असे सांगितले.
बाबुरावला पुन्हा घरी सोडायला तीच अॅम्ब्युलन्स आली. जणू बाबुराव गेलाच असं समजून अख्खी वस्ती रस्त्यावर, पण लांब अंतरावर थांबली. पण बाबुराव चालत, चालत घराकडं जाताना पाहून अजून जिवंत आहे असं समजून वस्तीनं सुस्कारा सोडला. पण आता तिकडं कोणीच जायचं नाही असं सर्वांना बजावलं. १०० वर्षात पहिल्यांदाच बाबुरावचं घर वस्तीपासून एकाकी पडलं. आजवर कोणी बहिष्कार टाकला नव्हता, नव्हे बाबुराव शिवाय वस्तीचंच काय, गावाचं देखील पान कधी हाललं नाही, त्या बाबुराववर एकांतात दिवस काढायची वेळ आली होती. वस्तीवरचे ते वस्तीवरचे, पण घरातले देखील कोणीच जवळ आले नाही पाहिजेत, म्हणून बाबुराव कोणाला काही न सांगता उसाच्या फडात शिरला. रखमानं मात्र फडाच्या बाहेरून कोणी-कोणी पैशासाठी फोन केले ते सांगितलं. बाबुरावला वाईट वाटलं.
बाहेरच्या गावातील लोकांना ही गोष्ट कळायला काही वेळ गेला. चुकून जेव्हा कोणी बाबुरावच्या घरासमोर यायचा, तेव्हा घरातूनच सारे बाबुराव उसात असल्याचा निरोप द्यायचे. मग बाबुरावला शोधायला तो आलेला बाहेरगावचा माणूस सऱ्या न सऱ्या धुंडाळाय़चा आणि तो आपल्याला शोधतोय म्हणून बाबुराव उसातूनच पळायचा..बाबुरावला हे काय आपल्या नशीबाला आलं म्हणून डोळ्यात पाणी यायचं. दोन दिवस तसेच काढले. तिसऱ्या दिवशी फोन आला. बाबुराव तुमचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, पण फार आनंदी होऊ नका, आपल्या कुटुंबासाठी अजून १० दिवस क्वारंटाईन व्हा.. दोन खोल्याच्या घरात म्हातारे आईवडील, घरात लहान चार पोरं हे डोळ्यासमोर पाहून बाबुराव रानातच क्वारंटाईन झाला. पण कोणाला तक्रार केली नाही.
चार दिवसांनंतर साऱ्या गावात तो निगेटिव्ह असल्याची माहिती कळाली, पण बाबुरावकडे येण्याची कोणाचीच हिंम्मत होत नव्हती. इकडं बाबुरावनं विचार केला. च्यामायला, आपण समद्यांसाठी एवढं खपलो, पण आपल्या दुःखाच्या काळात एकपण उपयोगाचा नाही, आता जरा गंमतच करू. मग बाबुरावनं मोबाईल काढला आणि अर्ध्या तासात दहा-पंधरा जणांना फोन केला. ज्यांना मशागतीचे पैसे द्यायचे होते, उसनवारीचे पैसे द्यायचे होते, औषधाचे पैसे द्यायचे होते, त्या सर्वांना त्यानं फोनवरून निरोप दिला. आत्ताच पैसे घेऊन जा असा निरोप दिला. पैसे लगेच मिळणार म्हटल्यावर सगळे आले, पण रस्त्यावरच थांबले. रखमाला कोणीतरी हाक दिली. तिनं बाहेर येऊन सगळ्यांना उसाच्या फडाकडं बोट दाखवलं.. सारे भीत-भीत फडापासून काही अंतरावर आले. बाबुरावला हाळी मारली. बाबुराव तसा चटदिशी बाहेर आला.. मुद्दाम खोकण्याचं नाटक केलं.. एक दोन शिंका मारल्या, तसे सारेच दचकले. पळायचं होतं त्यांना, पण शेजारचा पळत नाही म्हणून सारे एकमेकांकडे पाहत थबकले होते. बाबुराव जसजसा जवळ येईल, तसतसं साऱ्यांच्या अंगाचं पाणी पाणी होऊ लागलं…बाबुराव जवळ येईल, तसतसे सारे लांब लांब जाऊ लागले. बाबुराव मग पळायला लागला. तो पळायला सुरवात करताच, साऱ्यांनी धूम ठोकली..जिवाच्या आकांतानं सारे दुकानदार, देणेकरी पळू लागले. वस्ती हा पाठलाग पाहू लागली..कुत्र्यांनी सुरात सुर मिसळला…दुकानदार मागे वळून बघत बाब्या, पैसे फिटले रे, देऊच नको..पण मागं पळू नको.. असं म्हणू लागले..काही वेळानं हा पाठलाग थांबला..तेव्हा बाबुरावच्या डोळ्यातून फक्त पाणीच वाहत होतं…अजून तर कोरोना झालेला नाही, खरंच कोरोना होईल, तेव्हा माझ्या घरच्यांच किती हाल होतील असं वाटून त्यानं ठरवलं…..आता दहा दिवसंच काय, दहा महिने, जोपर्यंत कोरोना संपत नाही, तोपर्यंत समाजसेवा देखील बंद असा निग्रहच त्यानं केला…आपण कशाचीच काळजी न करता समोरच्यांच्या मदतीला जातो, समोरचा मात्र आपल्या वाईट काळात मदतीला येत नाही..हा धडा त्यानं मनावर घेतला..आता दहा दिवस होऊन गेलेत…बाबुराव घरी मस्त आहे…!!










