इंदापूर : महान्यूज लाईव्ह
परवा इंदापूर तालुक्यात तब्बल पंधरा जण कोरोना बाधित आढळले.. त्या दिवशी कोरोनाचा अहवाल फक्त सामान्यांसाठी नव्हे तर, आरोग्य खात्यासाठी देखील महत्त्वाचा होता.. कारण दोन आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतःहून कोरोनाची चाचणी केली होती… पाच महिने हे सर्वजण या लढ्यामध्ये सहभागी आहेत, पण आपल्यामुळे इतरांना कोरोना होऊ नये यासाठी त्यांनी ही चाचणी केली होती सुदैवाने ते कोरोना निगेटिव्ह निघाले.. दरवर्षी पंढरीची वारी पायी करत आरोग्याची सेवा करणारे या अधिकाऱ्यांनी यंदा आरोग्याची वारी मात्र कायम राखली.
इंदापूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी असलेले दिलीप जगताप यांची ही कहाणी सरकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तशी आदर्शच…! दिलीप जगताप हे दरवर्षी देहू ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याबरोबर करतात. गेली कित्येक वर्ष यामध्ये खंड पडत नाही, विशेष म्हणजे ते स्वतः या वारीत सहभागी होताना आपले अमूल्य योगदान म्हणून रस्त्याने पाण्याच्या टँकरमधील पाणी तपासणी करणे, आरोग्य संदर्भात जनजागृती करणे, कोणी आजारी आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करण्यासाठी मदत करणे अशी अनेक कामे ते या वारीदरम्यान करतात.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोना इंदापूर तालुक्याकडे कूच करत असताना आरोग्य खात्याला जखडून घ्यावे लागले. यामध्ये आरोग्य खात्याच्या संपूर्ण टीम बरोबर दिलीप जगताप देखील तेवढ्याच तत्परतेने पुढे होते. या सर्वांवर गेल्या सहा महिन्यानंतरही आजही ही जबाबदारी कायम आहे. आता तर इंदापूर तालुका कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे, अशा स्थितीत आरोग्य खात्याला आणखी दक्ष राहावे लागेलच, शिवाय स्वतःदेखील कोरोनाचे हेल्दी कॅरियर आपण असणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागेल. यावर्षी दिलीप जगताप यांची पंढरीची वारी चुकली याची खंत मनात असतानाच त्यांनी आरोग्याची वारी मात्र कायम राखली आहे. असे कोरोना योद्धे शहरी भागात मोठ्या संख्येने आहेत, पण ग्रामीण भागातही आहेत याची प्रचिती वेळोवेळी येत आहे.
अनेक कर्मचारी, अधिकारी गेली पाच ते सहा महिने आपले संपूर्ण क्षमतेने योगदान देत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी जगताप यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेतली, ती अशासाठी की, सतत चार महिने कोरोना कामकाज करत असताना, स्वतःमध्ये कसलीही लक्षणे नसताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी हे या आजाराचे वाहक ( कॅरीयर ) बनून इतरांना लागण करू शकतात. हे सामाजिक भान ठेऊन त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र त्यामुळे आपण आता आणखी निर्धास्तपणे हे काम तसेच पुढे नेऊन हा विश्वास ही जगताप यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना आला.










