बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील सूर्यनगरी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गुणवडी येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून नव्याने ३६ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहरात काल सूर्यनगरी येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या गुणवडी येथील युवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आज तपासणीत समोर आले आहे. तर काल रात्री घेतलेल्या नमुन्यांपैकी गुणवडी येथील युवक वगळता अन्य १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सकाळी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित अशा ३६ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शहरानजीक असलेल्या गुणवडी परिसरात एकही रुग्ण नव्हता. आज मात्र येथे एक रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.











