बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रीय तपास यंत्रणेने इसिसशी संपर्कात असल्याच्या कारणावरून पुण्यातील येरवडा येथून ताब्यात घेतलेली सादिया शेख बारामतीची विद्यार्थिनी आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणेने तिला ताब्यात घेताच बारामतीत सामान्यांमध्ये खळबळ उडाली, मात्र तिच्या समकक्ष विद्यार्थ्यांना मात्र आश्चर्यही वाटले नाही, का असं व्हावं?
सादिया शेख हिच्या बारामतीच्या कनेक्शनची जोरदार चर्चा कालपासून समाजमाध्यमांत होतेय, परंतू तिच्या एकंदर वर्तनाविषयी माहितगार असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र हे काही फार विशेष घडलेले आहे असे वाटलेच नाही, असे वाटण्यामागचे कारण आम्ही जाणून घेतले, तेव्हा तिच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने महान्यूज शी गप्पा मारत अंदर की बात सांगितली.
सादिया ही बारामतीतील मास कम्युनिकेशन या पत्रकारितेशी संबंधित शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिच्याविषयी शिक्षक काहीच बोलत नसले तरी विद्यार्थ्यांनी बरेच राज खुले केले. सादियाला आंतरराष्ट्रीय राजकारणात फार रस होता. त्यातही गुन्हेगारी जगताविषयी तिला प्रचंड माहिती होती, त्याचप्रमाणे तिला आंतरराष्ट्रीय कायद्यांविषयीही अधिक रुची होती. देशातील राजकारणाबाबतही सवाल जबाब करण्याची तिची पध्दत समोरच्या विद्यार्थ्यांनाही अचंबित करायची. अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या स्थानिक विद्यार्थी नेत्यांबरोबरही तिची काही वेळा खडाजंगी झाली.
शिक्षकांसमवेतही तिची तिच्या मतांनुसार डिबेटिंग चालायची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिच्याशी संपर्क टाळलाच होता. तिचे या बारामतीच्या महाविद्यालयात कोणीही मित्र अथवा मैत्रिणी नव्हते हे विशेष. तिच्या तब्येतीपुढे व आक्रमक पध्दतीपुढे सारेच नरमत असल्याने ती नेमकी येथेच शिकण्यासाठी का आली व तिने नेमका मास कम्युनिकेशनचाच विषय का निवडला हे प्रश्न विचारण्याचे धाडस विद्यार्थ्यांना झालेच नाही.
विशेष म्हणजे सादियाला दुसऱ्यांदा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी २६ जानेवारी २०१८ रोजी आत्मघातकी बॉम्बर असल्याच्या कारणावरून काश्मिर पोलिसांनी तिला अटक केली होती. पुण्याहून काश्मिरमध्ये आलेली एक मुलगी फार मोठा आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती काश्मिर एटीएस पथकाला मिळाली होती. त्यावरून तिला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मात्र काश्मिर पोलिसांनी तिला क्लिन चीट दिली होती. मात्र तरीदेखील पोलिसांचा संशय तिच्यावरून कमी झाला नव्हता. अर्थात बारामतीतही विद्यार्थ्यांच्या मते ती काश्मिर मध्ये जेव्हा पकडली गेली, तेव्हा काश्मिरमध्ये ती बीएस्सी नर्सिंग च्या प्रवेशासाठी गेली होती. तिची प्रवेश प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०१८ पासून सुरू होणार होती. मात्र त्यापूर्वीच ती २६ जानेवारी रोजी पकडली गेली.
अर्थात बारामतीच्या विद्यार्थ्यांना मात्र हे प्रश्न नक्कीच पडले आहेत की, काश्मिरमध्ये बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी गेलेली सादिया फिरून पुन्हा महाराष्ट्रात तेही पुण्याजवळच मास कम्युनिकेशन तिने का निवडले? व पुण्यात सोयीसुविधा असताना तिने बारामती का निवडले? महाराष्ट्र एटीएस कडे कदाचित याची उत्तरे आता मिळतील, कारण पहिल्यांदा पकडून सोडलेल्या सादियाला पुन्हा पकडण्यामागे नक्कीच काही कारणे दडलेली असतील, जी येत्या काळात स्पष्ट होतील..!











