इंदापूर : महान्युज लाईव्ह
आज बारामतीत जे 18 कोरोनाग्रस्त आढळून आले, त्यामध्ये लासुर्णे येथील आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून काम करणाऱ्या महिलेचा समावेश आहे, ही परिचारिका बोरी उपकेंद्रात काम करत असल्याने तेथील संपर्कातील दहा जणांची नव्याने कोरोनाची तपासणी होणार आहे.
लासुर्णे येथील ही आरोग्यसेविका बारामतीत श्रीरामनगर येथे राहते. या आरोग्यसेविकेच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले होते. दरम्यान तिचाही घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. शहरातील 25 कोरोना नमुन्यांच्या अहवालामध्ये या आरोग्य सेविकेचाही समावेश होता.
लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या बारामतीतील वसंतनगर येथील परिचारिकेच्या संपर्कात ही आरोग्यसेविका होती. ही आरोग्य सेविका नेमणुकीसाठी बोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात असते, या ठिकाणी तिचे काम सुरू होते. या दरम्यान तिच्या निकट संपर्कात आलेल्या दहा कर्मचाऱ्यांसह इतरांचीही कोरोनाची तपासणी होणार आहे.
दरम्यान तिच्या घशातील स्रावाचा नमुना हा रुई येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून तपासणीसाठी घेण्यात आला होता, परंतु काल इंदापुर मध्ये अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या वादानंतर या आरोग्यसेविकेला लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच क्वारंटाईन करण्यात आले होते, आता तिच्यावर उपचार हे इंदापूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये होणार की, तिचे निवासस्थान बारामतीच्या हद्दीत श्रीरामनगर येथे असल्याने तिच्यावर रूई येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार होणार होणार याविषयी आरोग्य प्रशासनामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.










