दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खोर येथे मेंढपाळ व त्याच्या मेंढराना अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष किसन हंडाळ यांनी दौंडचे तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात खेड्यापाड्यातील मेंढपाळ बांधवांवर मारहाणीच्या घटनेत वाढ झाली आहे. करमाळा तालुक्यात एका मेंढपाळाचा जबर मारहाणीत मृत्यु झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यातील खोर येथे एका मेंढपाळ बांधवांला व मेंढरांना मारहाण केल्याची घटना काही दिवसापुर्वी घडली आहे. विशेष म्हणजे याबाबत तक्रार घेण्यास विलंब करण्यात आला. तसेच मेंढराना प्रथमोपचार मिळाला नाही.
संबंधित मेंढपाळावर अन्याय होवूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संबंधित दोषी पोलिस अधिकारी व पशुवैदकीय अधिकारी यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसात याबद्दल योग्य ती कारवाई करावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किसन हंडाळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.











