दौंड तालुक्यात आतापर्यंत ३७ जण कोरोनामुक्त
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व कोरोना बाधीतावर त्वरित उपचारासाठी यवत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व स्वामी चिंचोली येथील दत्त कला इन्स्टिट्यूट या दोन ठिकाणी कोवीड उपचार सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी दिली.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यात कोरोनाचे नमुने तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. दौंड शहरातही कोरोनाचे तपासणी संख्या आटोक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णासाठी तपासणी व पहिल्या टप्प्यातील प्राथमिक उपचार कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधीतांचा आकडा ७२ वर पोहचला आहे. यापैकी ३७ जणांनी कोरोना वर मात करून घरी गेले आहेत. तर ३४ जणांवर सध्या उपचार सुरू असून एकजण मृत्यूमुखी पडला आहे.
यवत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व स्वामी चिंचोली येथील दत्त कला इन्स्टिट्यूट येथे कोरोनाची तपासणी व उपचार सुरू केले आहेत. दत्तकला इन्स्टिट्यूटमध्ये २०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागाला दिलासा देणारी बाब म्हणजे पाटस मधील सात ही कोरोना बाधीतांनी कोरोना वर मात केली आहे, त्याचबरोबर खुटबाव व वरवंड, मलठण कोरोना मुक्त झाले आहेत.










