महान्यूज लाईव्ह
भैय्या, दुनियामें सबसे बडा रुपय्या ! असे पैशाच्या मागे धावणारे हे जग आपण क्षणोक्षणी अनुभवत असतो. अशा वेळी पैशापेक्षा माणुसकीला आणि प्रामाणिकपणाला महत्व देणारा एखादा माणुस दिसला कि नवल वाटते, आणि मनापासून अशा माणसाचे कौतुक करावेसे वाटते.
जफर अली सज्जन यांचेही त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी याच कारणासाठी कौतूक केले आहे. हडपसर येथील रुद्रा मोटर्स येथे जफर टेक्निशनचे काम करतात. १६ डिसेंबरला त्यांच्याकडे एक हैरियर गाडी दुरुस्तीसाठी आली. ही गाडी दुरुस्त करताना त्यांना या गाडीच्या सीटखाली १ लाख रुपये रोख सापडले. अशावेळीस मोहात पडून आपले आयुष्याचे नुकसान करुन घेतलेले अनेकजण आपल्याला दिसतात. पण जफर यांच्या मनाला हा मोह शिवलादेखील नाही.
त्यांनी ती रक्कम वर्कशॉपचे व्यवस्थापक शेलार यांच्या सुपूर्त केली. त्यांनी ती गाडीमालकाला दिली.
जफर अली सज्जन यांच्या या प्रामाणिक कृतीबद्दल त्यांचे गाडीमालक आणि रुद्रा मोटर्सच्या व्यवस्थापनाने कौतुक केले आहे.











