मुंबई महान्यूज लाईव्ह
आतापर्यंत आपण जे ड्रोन पाहत किंवा ऐकत आलोत.. ते मुख्यत्वे मानवरहित ड्रोन विमाने आणि दुसरे म्हणजे फोटो किंवा व्हीडीओ दूर अंतरावरून, उंचीवरून काढण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन.. पण आता असे ड्रोन बाजारात येऊ शकतात जे तब्बल १०० ते १५० किलोचे वजन उचलू शकतील व हे वजन अगदी १०० किलोमीटर वेगाने घेऊन जाऊ शकतील…!
हो ही किमया शक्य होऊ शकते.. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय बनावटीचे स्वदेशी ड्रोन सध्या प्रायोगिक तत्वावर बनविण्यात आले आहे. बंगळूरू येथील ड्रोन न्यूजस्पेस रिसर्च अॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने या ड्रोनचे डिझाईन बनवले असून त्याची नुकतीच बंगळूरूत चाचणीही घेण्यात आली.
एआय तंत्राद्वारे या ड्रोनचे चलनवलन राहणार असल्याचे सांगितले जात असून यासंदर्भात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जोशी यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड या केंद्र सरकारच्या कंपनीबरोबर ही संस्था काम करीत असून येत्या दोन वर्षात कर्मशिअल तत्वावर हे ड्रोन बाजारात येऊ शकते.











