बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र तर पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे येथे सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते.
पुणे येथे मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय असून लवकरच बारामती येथे उपकेंद्र सुरु करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांना आवश्यक संधी मिळावी असे शासनाचे प्रयत्न आहेत. गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ” कमवा आणि शिका ” योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरुपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे. जागतिक स्पर्धेत यशस्वीपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे मतही सामंत यांनी व्यक्त केले.
यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार केल्याचे सांगितले. पदवी प्रदान समारंभात विविध विद्याशाखातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यापैकी ४३ स्नातकांना पीएचडी पदवी प्रदान केली.











