दौंड :महान्युज लाईव्ह
दौंडसह जिल्ह्यातुन दुचाकीची चोरी करणाऱ्या बहाद्दरास दौंड पोलिसांनी अटक केले असून चार दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. जस्साराम पुसाराम चौधरी ( वय २६, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. केडगाव ता. दौंड जि. पुणे ) असे हे दुचाकी चोराचे नाव आहे. या चोराने जिल्ह्यातील कोंढवा, लोणी काळभोर, दौंड या हद्दीतील दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दौंड शहरातील नगर मोरी चौकातून ७ डिसेंबर रोजी एक दुचाकी चोरी झाल्याचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. त्यानुसार दौंड पोलीस स्टेशन च्या डी बी पथकास गोपनीय माहिती मिळाल्याने एक संशयित आरोपीला केडगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या असून या दुचाकी चोरीची मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस नाईक अमोल गवळी, आदेश राऊत,आमिर शेख, निखिल जाधव, अभिजित गिरमे, पोलीस शिपाई अमोल देवकाते, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.











