भारतात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन विक्री सुरु केल्यानंतर गल्लोगल्ली आपले दुकान थाटून बसलेल्या दुकानदारांना त्याची झळ पोचू लागली आहे. याबाबत भारतातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली असून या ऑनलाईन विक्री करणाऱ्या संघटनांना वेसण घालण्याची मागणी सतत केली जात आहे.
याच प्रकरणी इटलीमधील सरकारी संस्थेने अॅमेझॉन या ई – कॉमर्स कंपनीला ९७५० कोटी ( १.३ अब्ज डॉलर) चा दंड ठोठावल्याची बातमी आली आहे. कंपनीवर युरोपात आपल्या बाजारातील मक्तेदारीचा दुरुपयोग करून लहान विक्रेत्यांची किंवा प्रतिस्पर्ध्यांची कोंडी केल्याचा आरोप आहे.
इटलीतील अॅंन्टी ट्रस्ट रेग्युलेटरी अॅथॉरिटीने हा दंड ठोठावला आहे. लहान प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी अॅमेझॉनने थर्ड पार्टी विक्रेत्यांना फायदा करून दिला. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या वस्तूंची विक्री आणि पुरवठ्यावर परिणाम करावा यासाठी आपल्या यंत्रणेचा वापर करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.
ही अॅथॉरिटी कुठल्याही कंपनीवर त्याच्या एकुण महसूलाच्या १० टक्क्यांपर्यंत दंड ठोठावू शकते. या निर्णयाला अॅमेझॉन उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. इटलीमध्ये २०१९ मध्ये थर्ड पार्टी विक्रेत्यांची ऑनलाईन जेवढी विक्री झाली होती, त्यापैकी ७० टक्के विक्री अॅमेझॉनवर झाली होती.