बारामती : महान्यूज लाईव्ह
शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन मिळवणे ही सर्व उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयांसाठी आवश्यक बनले आहे. तसेच हे मानांकन मिळवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सर्व महाविद्यालयांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनियरींगमध्ये एक दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा पार पडली.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. एस.आर.ई.एस. इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ.अजयकुमार ठाकूर यांनी मानांकन मिळवण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.
डॉ.अजयकुमार ठाकूर यांनी मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता पडताळणीसाठी लागणारे एकूण दहा निकष व परिमाणाचे मूल्यांकन याबाबतही या कार्यशाळेत ऊहापोह करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर , विविध माहितीचे संकलन , अध्यापन-अध्ययन सुधार प्रक्रियेविषयी , सध्य परिस्थितीत उद्भवत असलेल्या विविध शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निराकरणही डॉ. ठाकूर यांनी केले. नाविन्यपूर्ण आणि समाजपयोगी संशोधनावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेत भारतासह इथोपिया आणि नायजेरीया येथून एकूण १०२५ जणांनी सहभाग घेत ही प्रक्रिया समजावून घेतली. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन मिळवण्याचे फायदे व महत्त्व याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. तर या कार्यशाळेद्वारे एनबीए मानांकन मिळवण्यासाठी लागणारी माहिती समजून घेऊन ही प्रक्रिया आपल्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात सर्व सहभागींना निश्चितच फायदा होईल असे मत यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केले.
मुख्य समन्वयक प्रा. हरिश फडतरे व प्रा. इफ्तिकार पटेल यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. माधव राऊळ यांनी केले आणि आभार यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुशिल पाटील यांनी मानले. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, सचिव प्रमोद शिंदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.










