इतर कोरोनाबाधीत गावांना मात्र दिलासा..
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्यात मागील तीन दिवसांत १० जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. आज मात्र शहरातील ४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तालुक्यातील पडवी येथे एक महिला तर खोर येथे एकास कोरोनाची लागण झाली होती, तर वेताळ नगर येथील एकास कोरोनाची नव्याने लागण झाल्याची माहिती दौंड उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली. तालुक्यातील पडवी येथे ३० जून रोजी आढळलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील महिलेसही कोरोनाचे लागण झाली. बोरीपार्धी येथील एक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली, मात्र हा अहवाल खासगी प्रयोगशाळेचा असल्याने त्याची शासकीय तपासणी करण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
आरोग्य विभागाने या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्या घरातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये खोर व पडवी वगळता पाटस, वरवंड, चौफुला, मलठण, यवत, केडगाव, पारगाव, हंडाळवाडी, कुरकुंभ, खुटबाव, भरतगाव, सोनवडी या गावांतील संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या गावांसह प्रशासनासही मोठा दिलासा मिळाला आहे.










