महान्यूज लाईव्ह विशेष
तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणारे वायुदलाचे हेलिकॉप्टर निलगिरी पर्वतरांगामध्ये कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी, त्यांचे संरक्षण सचिवांसह १४ लोक होते.
यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. तीन जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना निलगिरी जिल्ह्यातील वेलिंग्डन कॅन्टोंन्मेंटच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे.
सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षारक्षक व भारतीय वायुदलाचे वैमानिक हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि सूलूर या दरम्यान कोसळल्याची माहिती आहे. सैन्यदल प्रमुख बिपीन रावत कोईम्बतूर जवळील सेलूर येथील भारतीय वायुदलाच्या ठाण्यावरून वेलिंग्टन येथील संरक्षण कर्मचारी महाविद्यालयास भेट देण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. आजच ते दिल्लीहून विमानाने सेलूरला आले होते.
ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले तेथून मोठ्या प्रमाणात ज्वाला भडकल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक लोक तातडीने मदतीसाठी धावले, लष्कराचे बचाव पथकही तातडीने घटनास्थळी पोचले.
तामिळनाळूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत.