महान्यूज टीम
” देश बदल रहा है ” चे नारे दररोज लावले जात आहेत. देश बदलतोय हे खरे, पण कसा तर गरीब जास्त गरीब होत आहेत, आणि श्रीमंतांची श्रीमंती आणखी वाढत चालली आहे.
ताज्या २०२१ च्या जागतिक विषमता अहवालात दिसणारे हे भारताचे चित्र आहे. आर्थिक विकासाची फळे देशातील १ टक्के श्रीमंतच मोठ्या प्रमाणात चाखत असल्याचे चित्र या अहवालातून स्पष्ट होते आहे.
राष्ट्रीय उत्पन्नातील २२ टक्क्यांचे वाटेकरी १ टक्के श्रीमंत आहेत तर, ५० टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा फक्त १३.१ टक्के आहे. याचाच अर्थ ५० टक्के लोकांच्या उत्पन्नापेक्षा सर्वात श्रीमंत १ टक्के लोकांचे उत्पन्न खुप जास्त आहे. आर्थिक विकास होत असताना ही विषमता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे हे चित्र आहे.
देशाने आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणाचे धोरण स्विकारले त्याला आता ३० वर्षे झाली. या धोरणाचा फायदा नेमका कुणाला झाला यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.
भारत हा एक गरीब आणि प्रचंड विषमता असलेला देश असल्याचे या अहवालात म्हणले आहे. फ्रान्समधील जागतिक विषमता लॅबने विविध पुराव्यांच्या आधारे संशोधन करून हा अहवाल तयार केला आहे.