मुंबई : महान्यूज लाईव्ह
स्विट्झलंड सरकारने आत्महत्या करण्यासाठीच्या मशीनच्या वापरासाठी परवानगी दिली आहे. ही मशीन बनविणाऱ्या कंपनीचा दावा आहे की, या मशीनच्या साह्याने कोणत्याही व्यक्तीला १ मिनिटात मृत्यू येऊ शकतो, आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. या मशीन द्वारे आक्सिजनचे प्रमाण कमी केले जाते, त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.
एक्झिट इंटरनॅशनल या कंपनीचे संचालक डॉ. फिलीप निट्स्के यांनी ही मशीन तयार केली आहे.
स्विट्झलंडमध्ये इच्छामरणाला मान्यता आहे. गेल्या वर्षात या देशातील १३०० जणांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने आपले जीवन संपविले असल्याचा एक्झिट इंटरनॅशनलचा दावा आहे.
असाध्य आजारामुळे जिवंत असूनही मरणयातना भोगणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा आहे. सध्या ही मशीन प्रत्यक्ष वापरात नाही. परंतू वर्षभराच्या काळात व्यावसाईक वापरासाठी उपलब्ध होईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अर्थातच यावर लोकांच्या प्रतिक्रिया फारशा चांगल्या नाहीत. असे मशीन तयार करून डॉ. निट्स्के लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर ही मशीन म्हणजे आधुनिक गॅसचेंबर असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
इच्छामरणाला परवानगी द्यावी की नाही यावर अनेक देशात चर्चा सुरु आहे. त्यासोबतच आत्महत्यांचे प्रमाणही जगभरात वाढताना दिसत आहे. केवळ वैद्यकीय सुविधा आहेत म्हणून जिंवत असणाऱ्या गंभीर स्थितीतील वर्षोनूवर्षे अंथुरणावर पडून असलेल्या रुग्णांचीही संख्या सतत वाढत आहे.
नैतिकता आणि व्यावहारिकता यामध्ये कोणत्या मार्गाने जायचे यावर या मशिनचा वापर होईल की नाही हे अवलंबून आहे.