दौंड : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील सातबाराचे 99 टक्के काम पुर्ण झाले आहे. सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आणि तलाठ्याची वाट पाहण्याची आता गरज नाही, शेतक-यांना तलाठी यांच्या सहीचा ऑनलाईन सातबारा उतारा मिळू शकतो तसेच पिकपाणीही अॅपद्वारे करू शकतात. डिजीटल सोयी सुविधा यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन रजा राखीव जिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले.
दौंड तालुक्यातील पाटस येथे मंगळवारी ( दि.7) महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभाग व वनविभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत मोफत ऑनलाईन सातबारा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटस परिसरातील शेतकऱ्यांना रजा राखीव जिल्हाधिकारी संजय तेली आणि दौंड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते मोफत ऑनलाईन सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रजा राखीव जिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले की, पुर्वी शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत होते. तलाठी कार्यालयात नसेल तर हेलपाटे मारावे लागत होते.आता मात्र शेतकऱ्यांना हेलपाटे आणि तलाठ्याची वाट पहावी लागणार नाही. शेतकरी कुठेही आणि
केंव्हाही तलाठी यांच्या सहीचा सातबारा उतारा ऑनलाईन बघु शकता आणि काढू शकतात. या सातबारा उताराचा वापर शेतकरी कामासाठी करू शकतात.
शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी तब्बल 10 लाख मोफत ऑनलाईन सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर 7 डिसेंबरला एकाच दिवशी जिल्हयातील 550 मोठ्या गावांमध्ये मोफत सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात 99 टक्के सातबाराचे व संगणकीकरणाचे काम पुर्ण आहे. एक टक्के काम हे सातबारावरील दुरूस्ती अभावी प्रलंबित आहे. पोटखराब व क्षेत्राची कमी जास्त असलेल्या नोंदी या अडचणीमुळे हे काम प्रलंबित आहे.
शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास तेही काम लवकच मार्गी लागेल. पोटखराब हे क्षेत्र लागवडी खाली करण्यासाठी व त्याची दुरूस्ती करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. मंडलाधिकारी यांच्या स्तरावर पोटखराब क्षेत्रही लागवडी खाली करु शकतात. पीकपाणी यासाठी ही नवीन अॅप आली आहे. शेतकऱ्यांनी ही अॅप डाऊनलोड करून आपल्या शेतातच पिकपाणीची नोंद करू शकतात. या डिजिटल अॅप व तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. असे मत जिल्हाधिकारी तेली यांनी व्यक्त केले.
दरम्यान दौंड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, दौंड तहसीलदार संजय पाटील यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सरपंच अवंतिका शितोळे,माजी सरपंच योगेंद्र शितोळे,तलाठी,मंडलधिकारी तसेच परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.