घनशाम केळकर : महान्यूज लाईव्ह
” हे पहा, जर तुम्ही या झुम वेबिनारचा हिस्सा असाल, तर तुम्ही त्या दुर्देवी लोकांमध्ये आहात, ज्यांना कंपनीने कामावरून कमी केलेले आहे. “.. फक्त या वाक्याने एका कंपनीतील चक्क ९०० जणांचा रोजगार एकाच क्षणात हिसकावून घेतला.. एक मिटींग आपल्या आयुष्याला उध्वस्त करणारी ठरल्याचा अनुभव सध्या एका कंपनीचे ९०० कर्मचारी घेत आहेत.
मॉर्गेज लेंडर बेटर डॉट कॉम ही ती कंपनी.. या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांचा झुम वेबिनार घेतला. या झुम वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याच भावनिक झुम कॉलमध्ये बोलताना गर्ग यांनी सांगितले की, ही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर दुसऱ्यांदा आलेली आहे.
कोवीडच्या संकटातून जग बाहेर पडत असले तरी या संकटामुळे अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेणे त्यांना भाग पडत आहे.
न्युयॉर्कमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी केव्हीन रायन यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात, हा अत्यंत दु:खदायक निर्णय होता. परंतू काही विशिष्ठ क्षेत्रात लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते, असे म्हणले आहे.
हॉवर्ड बिझनेस रिव्ह्यू या सर्वेक्षणात कोवीड संकटामुळे बाजारपेठेतील नोकऱ्यांच्या संधीवर झालेल्या परिणामाबाबत प्रकाश टाकण्यात आलेला आहे. कोवीडने या बाजारपेठेवर फार खोलवर परिणाम केलेला आहे. व्यवस्थापकांना तणाव आणि दु:खद प्रसंगाना तोंड द्यावे लागते आहे. या व्यवस्थापकांचेही पद धोक्यात आहे, अशी स्थिती जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये निर्माण झालेली आहे.