बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथे २ डिसेंबरला भिगवणच्या तीन जणांना अडवून व त्यातील एकाचे अपहरण करून त्यांची लूट करणाऱ्या दोघांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भिगवण येथील हॉटेल निसर्गमध्ये काम करणारे तीनजण २ डिसेंबरला बारामती येथे आले होते. त्यांनी रात्री साडेबारा वाजता भिगवण रोडवर कोर्टाजवळ अडवून दोन जणांनी मारहाण केली. हत्याराचा धाक दाखवून पैशाची मागणी केली.
परंतू त्यांच्याजवळ पैसे नसल्याने त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यातील दोघे पळून गेले, तर पवनकुमार प्रथम लाल याला या दोघांनी पकडून ठेवले. त्याची डिस्कव्हर मोटर सायकल ताब्यात घेतली. पवनकुमारलाही बरोबर घेऊन त्याला एका तालमीत दोराने बांधून ठेवले. त्याला इतर दोघांकडून पैसे आणण्यास सांगितले.
पण पवनकुमारकडे कोणाचाही नंबर नसल्याने तो कोणालाही फोन करू शकला नाही. त्याला त्यांनी दोन तीन तास डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी झोपी गेल्यावर पवनकुमार दोर सोडवून पळून गेला.
तो भिगवणला निसर्ग हॉटेलमध्ये मालकाकडे गेला . दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पवनकुमार याला रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो पोलिसांनी दाखवले, त्यावेळी त्याने बालाजी अनील माने, ( वय २०, रा. नेवसे रोड) याचा फोटो ओळखला. पोलिसांनी बालाजी माने याला तातडीने ताब्यात घेतले.
बालाजी माने याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत प्रतीक दिलीप रेडे (वय 20, रा. बारामती ) होता असे त्याने सांगितले. बालाजी माने हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खून, घरफोडी, जबरी चोरी, हत्यार जवळ बाळगणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.