इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सुरेश मिसाळ
पुणे – सोलापूर रोडवर सरदारजी ढाब्याजवळ झालेल्या अपघातास पीएसईपीएलजी ही रस्त्याची देखभाल करणारी कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख, तर जखमींना प्रत्येकी १० लाख भरपाई द्यावी अशी मागणी शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन आरडे यांनी केली आहे.
२७ नोव्हेंबरला मळीचा टँकर व तांदूळ वाहतूक करणारा ट्रक यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच मृत्युमुखी पडले,तर ६ जण गंभीर जखमी झाले.
हिंगणगाव येथे पूर्वीच्या महामार्गावर एक पूल होता. सदर पुलाचे काम करून वाहतूक करण्याऐवजी रस्ते तयार करणाऱ्या कंपनीने सदर पुलाच्या दोन्ही बाजू बुजवून त्यावर रस्ता केला. परिणामी आजूबाजूला आलेले पाणी वाहून जाण्याची सोय नसल्यामुळे पाणी तेथेच मुरले व त्या ठिकाणी रस्ता खचला. सदर रस्ता दुरुस्त करत असताना वाहतूक वळवण्यात आली होती. त्याबाबत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना प्रवासी वाहनांना देण्यात आलेली नव्हती व नाही. तसेच सुरक्षेच्या कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या पी.एस.ई.पी.एल.कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे सदर अपघात घडलेला असून त्या अपघातात पाच निष्पाप नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे.असा आरोप नितीन आरडे यांनी केला आहे.
सदर घटना अत्यंत गंभीर असून याबाबत तात्काळ तज्ञ समिती नेमण्यात यावी व पी.एस.ई.पी.एल कंपनी व प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.अपघातात मयत नागरिकांच्या नातेवाईकांना रु २५ लाख व जखमी व्यक्तींना रु. १० लाख नुकसान भरपाई पी. एस. ई. पी. एल कंपनी कडून देण्यात यावी,अशी मागणी आरडे यांची आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, मृताना न्याय मिळवून देण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने ७ डिसेंबरपासून शासकीय वेळेत इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही नितीन आरडे यांनी दिला आहे.
नितीन आरडे यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून निवेदनाच्या प्रती पुणे विभागीय आयुक्त,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय अधिकारी, तहसीलदार,पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन इंदापूर, व्यवस्थापक एन.एच.ए.राष्ट्रीय महामार्ग पुणे यांना पाठवण्यात आल्या आहेत.