बांधकाम विभागाचा वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली असून बांधकाम विभागाच्यावतीने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Heavy rains lashed Pasrani Ghat on Wai Mahabaleshwar Road yesterday, Pune Mumbai)
रात्रभर पडणाऱ्या धो धो पावसामुळे वाई महाबळेश्वर रस्त्यावर दत्त मंदिरनजीक मोठी दरड पसरणी घाटामध्ये कोसळली. त्यातच कालपासून धुक्याचे साम्राज्य संपूर्ण घाटात पसरल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संततधार पडणारा पाऊस धुके यामुळे वाहन चालकांची वाहन चालवताना कसरत होत आहे.
दत्तमंदिराच्या नजीक पडलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सदरची माहिती बांधकाम विभागास मिळताच तातडीने बांधकाम विभागाचे श्रीपाद जाधव आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यातील मोठमोठे दगड हलवण्याचे काम युध्दपातळीवर करुन वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत केली. सायंकाळपर्यंत रस्त्यातील मोठमोठ्या दगडी हलविण्याचे काम सुरू होते. तर एका बाजूने वाहतूकही सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली होती.
संततधार पडणाऱ्या पावसामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी आपले वाहने कोठेही उभी करू नयेत, असे आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.