पुणे : महान्यूज लाईव्ह
असं म्हणतात की एखाद्या महिलेचा दुःख दुसरी महिलाच जाणू शकते..! पण, इथे पहा, जिथे एका महिलेची तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार होती.. या घटनेत गुन्हा दाखल करू नये म्हणून चक्क महिला फौजदारानेच एक लाखांची लाच मागितली.. तिला साथ त्याच पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराने दिली.. मग तडजोडी अंती 70 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महिला फौजदाराला अटक केली.. ही सारी घटना पुण्यातील सांगवी पोलिस ठाण्यात घडली!
महाराष्ट्रातील लाचखोरीला निलाजरेपणाचा प्रत्यय आणणारी घटना पुण्यातील सांगवी पोलीस ठाण्यात घडली, जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगवी पोलीस ठाण्यातील हेमा सिद्धाराम सोळुंके (वय 28 वर्षें) या महिला फौजदारास लाच घेताना पकडले. ही लाच याच पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक बाळकृष्ण देसाई याने स्वीकारली. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचलेला पाहताच, देसाई तेथून पळून गेला. त्यावेळी त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी अत्यंत बेदरकारपणे चालवली.
यातील घटना अशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आलेल्या तक्रारीनुसार तक्रारदाराविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात बलात्कारासंदर्भातील तक्रारी अर्ज दाखल आहे. या अर्जाची चौकशी महिला फौजदार हेमा सोळुंके हिच्याकडे होती. या अर्जावरून सोळुंके हिने तक्रार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू नये, यासाठी तक्रारदाराकडे सोळुंके हिने एक लाख रुपयांची मागणी केली होती, म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
त्याची पडताळणी केल्यानंतर हेमा सोळुंके हिने एक लाख रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचेची रक्कम देण्यासंदर्भात तक्रारदार आणि सोळुंके या दोघांमध्ये तडजोड झाली आणि 70 हजार रुपयावर ही लाच ठरली. ही लाच स्वीकारताना देसाई तेथे आला होता. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.
याची कुणकुण लागताच देसाई तेथून पैसे स्वीकारून पळून गेला. या घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक करताहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.