बारामती : महान्यूज लाईव्ह
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह आज अखेर निलबिंत झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निलंबनाच्या फाईलवर सही केली असून निलंबनाचा आदेश आजच निघण्याची शक्यता आहे. परमबीरसिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. ते २५ नोव्हेंबरला मुंबईला परतले आहेत. राज्य सरकार जणू त्यांची परतण्याचीच वाट पहात होते. त्यामुळे ते येताच लगेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सध्याच्या काळातील चर्चेत असलेले नाव म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह. रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणाने सुरवात झालेल्या या सगळ्या प्रकरणाने आता इतकी वळणे घेतली आहेत, याचा मुळ धागा कुठे आहे हे या सगळ्या गुंतागुंतीत लोक विसरून गेले आहेत. लोक हेदेखील विसरून गेले आहेत की याच परमबीरसिंहांसाठी राज्य सरकार आणि गृहमंत्री केंद्रसरकारशी भांडत होते. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाच्या वेळी हेच परमबीरसिंह राज्यसरकारचे फारच लाडके बनले होते. पण मुकेश अंबानीच्या घरासमोर ठेवलेला बनावट बॉम्ब जणू राज्यसरकारवरच फुटला.
यानंतर असे सुरस आणि चमत्कारिक घटनांचे सत्य समोर आले, ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती. सचीन वाझे या पोलिस अधिकाऱ्यानेच मनसुख हिरेन या माणसाच्या मदतीने हा बॉम्बचा बनाव केला होता, या प्रकरणाचा तपसाही सुरुवातीला वाझेंकडेच होता, आणि त्यावेळेस गृहमंत्री अनील देशमुख वाझेंची विधानसभेत पाठराखण करत होते. पण हळूहळू या प्रकरणाचे गांभिर्य वाढत गेले. मनसुख हिरेन गायब झाला, त्यानंतर त्याचे प्रेत सापडले, आणखी अखेर त्याचा खून झाला असून तो सचीन वाझेंनीच आपल्या पोलिस सहकाऱ्यांच्या मदतीने केला असल्याचे उघडकीस आले. सचीन वाझेंसारख्या माणसावर विश्वास ठेवण्याची किंमत मनसुख हिरेन याला आपला जीव गमावून द्यावी लागली. हे सगळे घडल्यावर सचीन वाझेंना अर्थातच जावे लागले. या सगळ्याचा जबाबदार म्हणून त्यांचे वरिष्ठ अधिकारी परमबीरसिंह यांची बदली करण्यात आली.
या बदलीमुळे परमबीरसिंह इतके दुखावले गेले की, त्यांनी एक लेटरबॉम्ब फोडला. हा या प्रकरणातील दुसरा बॉम्ब.
या लेटरमध्ये त्यांनी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर आरोप केले. सचीन वाझेला प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्र्यांना जबाबदार धरले. दरमहिना १०० कोटीची वसुली मुंबईतील बारचालकांकडून करण्याची जबाबदारी सचीन वाझेंवर सोपविण्यात आल्याचेही या पत्रात त्यांनी म्हणले. हे पत्र त्यांनी प्रथम मिडियात प्रसिद्ध केले आणि नंतर प्रत्यक्षात पाठवले. या लेटरबॉम्बचा दणका इतका मोठा होता की, गृहमंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. केंद्रसरकारला अर्थातच संधी मिळाली, आणि केंद्रीय तपास यंत्रणा या विषयाच्या मागे लागल्या. यानंतर ” काचेचे घर असलेल्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नयेत ” या म्हणीचा पुरेपूर अनुभव परमबीरसिंह यांना आला. पोलीस अधिकारी म्हणून त्यांनीही अनेक उद्योग केले होते. ते आता पुढे येऊ लागले, त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ लागले. त्यानंतर अशी वेळ आली की ते मुंबईतून गायब झाले. याच वेळेस केंद्रीय यंत्रणा अनील देशमुखांना चौकशीसाठी बोलावत होत्या, पण ते हजर राहत नव्हते.
महाराष्ट्राच्या जनतेने असेही दिवस पाहिले की राज्याचे माजी गृहमंत्री आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दोघेही अनेक दिवस गायब आहेत, म्हणजेच कायद्याच्या भाषेत ” फरार ” होते.
कथा मोठी रोचक आहे, अखेर एक दिवस माजी गृहमंत्री चौकशीसाठी हजर झाले आणि जसे अपेक्षित होते तशी त्यांना अटक झाली. त्यानंतर काहीच दिवसात इतके दिवस गायब असलेले परमबीरसिंह मुंबईत परत आले. त्याअगोदर त्यांनी न्यायालयातुन अटकेपासून संरक्षण मिळवले होते.
यानंतर एक दिवस या कथेतील तीन महत्वाची काल परवा पुन्हा एकत्र आली. राज्यसरकारने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी आलेले सचीन वाझे आणि परमजीतसिंह यांनी तासभर एकमेकांशी गप्पा केल्या. दुसऱ्या दिवशी माजी गृहमंत्री अनील देशमुख आणि सचीन वाझे दहा मिनिटे एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान परमबीरसिंहांनी स्वत:च फोडलेल्या लेटरबॉम्बची वात काढण्याचा प्रयत्न करीत आपण केलेले आरोप हे ऐकीव आहेत, आपल्याकडे काहीच पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र दिले. दुसरीकडे सचीन वाझेही १०० कोटी वसुलीच्या आरोपांपासून चौकशी आयोगासमोर लांब पळताना दिसले.
आता हे प्रकरण हळूहळू शांत होत जाईल असे वाटत होते. पण आज राज्यसरकारने परमबीरसिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करत पुन्हा एकदा यामध्ये रंग भरले.
आता खरे काय आणि खोटे काय ? मुकेश अंबानीच्या घरासमोर ठेवलेला बॉम्ब का १०० कोटी वसुलीचे आदेश ? यातले सत्य आपल्याला कधी कळेल असे वाटत नाही. पण या सगळ्या खेळात बळी गेलेला मनसुख हिरेन मात्र आज सगळ्यांच्या आठवणीतही राहिलेला नाही. वाझेसाहेबांवर माझा विश्वास आहे, ते मला या प्रकरणातून बाहेर काढतील असे आपल्या भावाला फोनवर सांगणाऱ्या मनसुखला भेटीसाठी बोलावून सचीन वाझेंनी कसे मारले याची कहाणी आज कोणाला आठवणार नाही. या कामात वाझेंच्या दहशतीमुळे सामील झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचे ” काही वेळेस आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याच्याच विश्वासघात करावा लागतो ” हे व्टिट देखील लोक केव्हाच विसरून गेले असतील.
पण अजूनही गोष्ट संपलेली नाही.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त