शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील येळेवस्ती येथे कडाक्याच्या थंडीमुळे गारठून तब्बल ११ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर दुसऱ्या घटनेत पिंपरी दुमाला येथेही ४० ते ४५ मेंढ्या मयत झाल्याची माहिती समोर मिळत आहे.
अनिल लिंबाजी कोळपे (रा. येळेवस्ती,शिरसगाव काटा) असे मेंढपाळाचे नाव असून त्यांच्या 11 मेंढ्या मयत झाल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१) रोजी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्याचप्रमाणे मध्यरात्रीपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. मेंढपाळ अनील लिंबाजी कोळपे यांच्या मेंढ्या या धुमाळवाडी हद्दीत बसायला होत्या. हवेत प्रचंड गारठा असल्याने मध्यरात्री १ च्या सुमारास गारठा सहन न झाल्याने कोळपे यांच्या ११ मेंढ्या थंडीने गारठून मयत झाल्या. याविषयी बोलताना कोळपे यांनी सांगितले की, रात्री पाऊसही खूप असल्याने मेंढ्या वाचवण्याचे प्रयत्न फोल ठरले. पहाटेच्या सुमारास शेकोटी पेटवल्यांनतर उर्वरित मेंढ्या वाचवण्यास यश आले. सध्या पाच ते सहा मेंढ्या मरणासन्न अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या घटनेची माहिती कळताच, शिरगाव काटाचे कामगार तलाठी वाय. एम. टिळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
सदरील मेंढपाळ अनील कोळपे यांनी शासनाने झालेले नुकसान पाहता त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत पिंपरी दुमाला येथील मेंढपाळ देविदास शिंदे व रामदास शिंदे यांच्याही तब्बल ४० ते ४५ मेंढ्या थंडीने गारठून मयत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान गुरुवारीही सकाळपासून थंडीचा कडाका कायम असून शेतकरी,मेंढपाळ यांनी जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवण्याबरोबरच जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे.