बारामती : महान्यूज लाईव्ह
नव्याने सापडलेला ओमिक्रॉन कोराना विषाणू किती घातक आहे याची माहिती हवी असेल तर दक्षिण आफ्रिकेतील वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवरून तुम्हाला कल्पना येऊ शकते.
मंगळवारी दक्षिण आफ्रिकेत ४३७३ कोरोना रुग्ण होते, ते वाढून बुधवारी ८५६२ झाले आहेत. म्हणजे एकाच दिवसात दुपटीने रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनीही अशा प्रकारे वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. या संख्येत दुपटीनेच नाही तर तिपटीनेही वाढ होऊ शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत दररोज २०० कोरोना रुग्ण वाढत होते. नोव्हेंबरच्या मध्यावर यामध्ये वाढ होऊ लागली. डिसेंबमध्ये तर दररोज ४००० पेक्षा जास्त रुग्णांची भर यात पडू लागली आहे. ही वाढ ओमिक्रॉन कोरोना विषाणूमुळेच होत असावी अशी शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रयोगशाळांमध्ये याबाबत सखोल तपासणी सुरू आहे.
यातून दिलासा देणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या प्रमाणात कोरोना संक्रमितांची संख्या वाढते आहे, त्या प्रमाणात दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत नाही.
ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा प्रसार खुप वेगाने होतो, त्यामुळेच तो धोकादायक आहे, असे संशोधकांनी सांगितले होते, त्याचा प्रत्यय या रुग्णवाढीमुळे येत आहे.