बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती पोलिसांनी आज मध्य प्रदेशमधून आलेल्या व पाटस रोड येथे लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हूणून काम करणाऱ्या गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे जप्त केली.
सध्या पुणे जिल्ह्यात गावठी पिस्तूल बाळगण्याचे व त्याद्वारे गुन्हे करण्याचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे. दोनच दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कांदळी येथे अनंत पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला गोळ्या घालून दरोडेखोरांनी ठार मारल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात तीव्र मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या मोहिमा सुरू आहेत. बारामती शहर पोलिसांनीही पूर्वीच्या रेकॉर्डवरील अग्नीशस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची तपासणी मोहिम सुरू केली. या मोहिमेदरम्यान पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांना प्रताप अमरसिंग पवार (वय 21 वर्ष, रा. बागमळा, तालुका 15 जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश, सध्या रा. महादेव मळा, पाटस रोड, रिंग रोड सुरंजन हॉटेल बारामती) हा लेबर कॉन्ट्रॅक्टर स्वतःजवळ एक अग्निशस्त्र बाळगून आहे ही माहिती मिळाली.
ही माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शुक्रवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर छापा मारला व त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅक्झिन व दोन 7.65 जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हा आरोपी हा मूळ मध्य प्रदेश येथील असल्याने त्याने तिथूनच ते हत्यार आणल्याचे सांगितले. त्यांनी आणखी कुणाला अशा प्रकारे बेकायदेशीर हत्यार विक्री केली आहे का? तो मजूर लोकांना धाक दाखविण्यासाठी याचा वापर करत होतो का? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, मनोज पवार, अभी कांबळे व तपास पथकाने केली.











