
वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा बंदीची अमलबजावणी
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने जिल्ह्याबाहेरील सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कोरोना संसर्गाच्या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला.
आज वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार यांनी जिल्हाबंदीसंदर्भात अधिक माहिती दिली. इंदापूर तालुक्यातील जंक्शन, कळंब, शेळगाव या भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलीस स्टेशनने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्ह्याबाहेरील सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी वालचंदनगर नातेपुते कळंबोली पूल, चिखली बंधारा, कुरवली पूल, जांब बंधारा, तावशी पूल या मार्गावरील जिल्ह्याबाहेरील वाहतूक बंद करण्यात आलेली असून जो कोणी ई – पास शिवाय पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करेल, त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना विना मास्क बाहेर पडू नये विना मास्क आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल व सदरची वाहन जप्त करण्यात येईल. जे नागरिक कामासाठी पुणे मुंबई याठिकाणी कंटेनमेंट झोन मध्ये जाऊन पुन्हा गावी आल्यास त्यांनी तात्काळ सदरची माहिती पोलीस प्रशासन तसेच ग्राम प्रशासनाला माहिती देऊन क्वारंटाईन राहावे. जर वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास साथीचे रोग अधिनियम या अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिलीप पवार यांनी दिला.
दरम्यान कंटेनमेंट व बफर झोन मध्ये कोणी विनाकारण “ई पास” शिवाय प्रवास करताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई येईल तसेच सदरचे वाहन जप्त करण्यात येईल.कंटेन्मेंट व बफर झोन मध्ये कोणीही धार्मिक कार्यक्रम, लग्न इत्यादी करणार नाही याची दक्षता घ्यावी. लग्न परवानगीसाठी इंदापूर तालुका दंडाधिकारी यांच्या परवानगीनेच लग्न विधी करावा,असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोनाचा संसर्ग असलेल्या गावांमध्ये भेटी देऊन येथील ग्रामस्थांनी संवाद साधला, तसेच प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठीच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.










