दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील चौफुला ३ जुलै रोजी कोरोनाचा रूग्ण आढळला, मात्र १ जुलै रोजी या रुग्णाच्या वडीलांचे निधन झाले होते, त्यानंतर रुग्णास त्रास सुरू झाला, वडीलांनाही तोच त्रास होता, मात्र त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली नव्हती, मात्र मुलाची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली, त्यावेळच्या अंत्यविधीस पाटस येथील ३५ जण उपस्थित राहील्याने आता आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
कोरोनाबाधीत व्यक्तीच्या वडीलांच्या अंत्यविधीसाठी पाटस मधील ३५ जण उपस्थित होते. धक्कादायक बाब अशी की, वडीलांना देखील मृत्यूसमयी सर्दी, खोकला व तापाचा त्रास होता. मात्र कोरोना चाचणी करण्यात आली नाही, अंत्यविधीनंतर जेव्हा मुलास त्रास होऊ लागला, तेव्हा त्याची कोरोना चचाणी करण्यात आली व त्यामध्ये तो कोरोनाबाधित आढळला. आता मात्र त्या अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात हा कोरोना बाधीत व्यक्ति आला असल्याची शंका आरोग्य विभागाला असल्याने या अंत्यविधीसाठी तालुक्यातील कोण कोण उपस्थित होते याचा शोध आरोग्य विभागाने घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यातच अंत्यविधीसाठी पाटस परिसरातील सुमारे ३५ जण उपस्थित होते आणि या ३५ जणांच्या संपर्कात ६७ जण आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ तुकाराम बनसोडे व आरोग्य सेवक भिमराव बडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान या ६७ व्यक्ती आपापल्या कुटुंबातील व्यक्तीच्या संपर्कात आल्या असतील, तर त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे.
मात्र सध्या आरोग्य विभागाची मोठी डोकेदुखी ही संपर्कातील व्यक्तींचीच बनली आहे. दौंड शहरात अशी घटना काही दिवसापुर्वी घडली होती. शहरातील एका कोरोना बाधीत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी १५० च्या आसपास नागरिक उपस्थित राहिले होते, त्यानंतर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला होता. त्याची पुनरावृत्ती तालुक्यातील ग्रामीण भागात चौफुला येथील घटनेवर होते ती काय याची चिंता आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे विवाह, अंत्यविधी व अनेक सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवून नियमांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सामुहीक संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.











