बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यात तीनचाकी सरकार म्हणवल्या जाणाऱ्या महाविकासआघाडीतच आता एकमेकांना चेकमेट सुरू आहे. आज पारनेरचे आमदार निलेश लंके बारामतीत आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत असतानाच त्यांनी सोबत पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेले पाच नगरसेवक बरोबर आणले आणि थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात आज बारामतीतून राष्ट्रवादीला बळ मिळाले.
पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे वजन वाढले आहे. विशेष म्हणजे पारनेर नगरपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादीचेच सत्तेसाठी जुगाड होते, असे असताना पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागचे नेमके राजकारण हे शिवसेनेंतर्गत नाराजी की, आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्यातील शीतयुध्द हे येत्या काळात दिसेल.
अर्थात आज नगरसेवकांना घेऊन आलेले निलेश लंके दुपारी मात्र चांगलेच रिलॅक्स झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा पदाधिकारी मोहसीन पठाण यांनी घेतलेली बुलेट गाडी निलेश लंके यांनी पाहिली व मोहसीन यांना पाठीमागे बसवून त्यांनी बुलेटवरून सवारी केली.










