इंदापूर : महान्युज लाईव्ह
जंक्शन, लाकडी, कळंब पाठोपाठ पश्चिम भागात बोरी येथे एका फळविक्रेत्यास कोरोनाची लागण झाली आहे.
बोरी गावातील मल्हारवाडी येथील हा फळविक्रेता पुणे-मुंबई येथे फळे खरेदी-विक्रीच्या निमित्ताने ये-जा करीत असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली असून मागील आठवड्यात मंगळवार पासून त्याचा त्रास सुरू होता. त्याने स्थानिक ठिकाणी जुजबी उपचार घेतले, मात्र फरक पडत नसल्याने येथील डॉक्टरांनी त्यास बारामती येथे खाजगी दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला. तेथे क्ष-किरण तपासणी झाल्यानंतर त्या रुई येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होण्यास सांगितले. तेथे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. आज सकाळी त्याचा अहवाल आला आहे. पंचवीस वर्षीय हा फळ विक्रेता इतर कोणाच्या संपर्कात होता का, याची माहिती आरोग्य प्रशासन घेत असून इंदापूर तालुक्यात हळूहळू गावागावामध्ये कोरोना हातपाय पसरू लागला आहे हेच यातून दिसून आले आहे.
दरम्यान लाकडी, जंक्शन येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तसा लोकांना दिलासा मिळाला आहे, मात्र दररोज नव्या नव्या गावात कोरोनाचे रुग्ण दिसून येणे ही बाब इंदापूर करांसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. दौंड तालुक्यात देखील दररोज वेगवेगळ्या गावांमध्ये कोणाचे रुग्ण आढळत असल्याने दौंड प्रमाणे इंदापूरची परिस्थिती व्हायला नको यासाठी इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.










