
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज इंदापूरला हादरवणारी घटना घडली, इंदापूर मध्ये पहिल्यांदाच एकाच वेळी तब्बल बारा जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यामध्ये इंदापूर शहरात 5, शेळगाव मधील 5 , लासुर्णे येथील 3 असे 13 रूग्णांचा समावेश आहे. रेडणी येथे मात्र कोणीही रूग्ण सापडलेला नाही.
आरोग्य विभागाच्या सुरवातीस दिलेल्या माहितीत चुकून रेडणीचे नाव आले होते. आज इंदापूर तालुक्यात आढळून आलेल्या या मोठ्या आकडेवारीने मात्र आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. काल इंदापूर तालुक्यात तीन रुग्ण आढळले होते. लाकडी, शेळगाव व जंक्शन येथील रुग्णांच्या निकटचे नमुने आरोग्य विभागाने घेतले होते. लाकडी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या निकटच्या नातेवाईकांसह शेळगावच्या रूग्णाच्या संपर्कातील व जंक्शनच्या रुग्णाच्या संपर्कातील तसेच इंदापूर मधील मिळून 36 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुका आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जगताप यांनी ही माहिती दिली.










