बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामतीत नव्याने लोणी भापकर आणि बारामती शहर असे मिळून दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी ही माहिती दिली.
लोणी भापकर येथील रुग्ण हा पोलीस असून तो लोणावळ्यावरून येथे आलेला होता. लोणावळ्यातील त्याच्या खोलीतील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा पोलीस कर्मचारी लोणी भापकर येथे आला होता, त्याची तपासणी केली असता, आज तो देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे, तर बारामती शहरातील अर्बन ग्राम येथील कालच्या कोरोनाग्रस्त आयटी अभियंत्याच्या संपर्कातील सहा जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्याच्या भावासही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. आज आढळलेल्या नव्या रुग्णांवरही रुई येथील केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज नव्याने दोन रुग्ण आढळून आल्याने बारामती शहरात सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांसाठी एक मोठा धडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इंदापूर येथे एका दिवशी 13 रुग्ण आढळून आल्याने इंदापूर तालुक्यातील नागरिकांचा बारामतीशी असणारा संपर्क लक्षात घेता बारामतीकरांनी अधिक सावध होण्याची गरज आहे.










