इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाने माणसांना सोशल डिस्टन्सिंगची साद घातली असेल… पण मग काय माणूसकीला देखील डिस्टन्सिंगच असावं का?…अर्थात या राष्ट्रीयीकृत बँकांनी स्वतःचा समज काहीतरी वेगळाच करून ठेवलाय…एरवी गुंतवणूकीसाठी, ठेवीसाठी ज्या बचत गटापासून ते व्यावसायिकापर्यंत साऱ्यांसाठी ग्रीन कार्पेट अंथरले, त्या बँका सध्या खातेदारांना बाहेरच उभ्या करतात, खातेदार जणू अस्पृश्य असून खातेदारांसाठी या बॅंका छळछावण्या बनल्या आहेत..दिवसभर बाहेर उन्हात उभ्या केलेल्या खातेदारांना बँकेचे अधिकारी दुरूनही बोलत नाहीत..सणसरच्या महाराष्ट्र बँकेपासून ते युनियन बँकेपर्यंत हीच तऱ्हा आहे.. राष्ट्रीयीकृत बँकांना नेमके काय झालेय हेच समजेनासे झाले आहे.
व्हिडीओ पहा
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम कठोर ठेवले आणि बँकांनी तो प्रचलित रुढच ठरवला. आता कोरोनाचे अनलॉक सुरू आहे. मात्र बँकांनी त्यांचे दरवाजे जे बंद केले आहेत, तसेच बंद ठेवले आहेत. त्या मानाने पुणे जिल्हा बँकेत बहुधा कोरोना चावून खाल्लेले कर्मचारी काम करतात, कारण येणाऱ्या खातेदारांना हात धुण्याचा सल्ला देऊन ठरावीक अंतर पाळून हे कर्मचारी व्यवस्थित वागणूक देतात.
भवानीनगर येथील महाराष्ट्र बँकेची तऱ्हाच निराळी.गेली चार ते पाच महिने झाले, येथील दरवाजे खातेदारांसाठी कायमचे बंद आहेत. अपवाद काही व्हिआयपींचा. त्यांना जणू कोरोना होणार नाही याची खात्रीच या अधिकाऱ्यांना असावी, कारण त्यांना मात्र पाठीमागून प्रवेश मिळतो. बाकी येणारे सर्व खातेदार तसे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने उपरेच असतात..
बँकेच्या आतमध्ये अधिकारी काम करतात. एक सुरक्षारक्षक दरवाजाजवळ येतो आणि खातेदारांवर खेकसत राहतो. दिवसभर त्याला जणू हे काम ठरवूनच दिलेले आहे. या बँकेच्या शाखेत बहुतांश हिंदीभाषिक कर्मचारी व अधिकारी काम करीत असल्याने त्यांची उर्मठ भाषा खातेदारांचा सातत्याने अपमान असते.
आज (ता.३०) या बँकेतील खातेदारांशी संवाद साधला. आपली छोटीछोटी मुले घेऊन उन्हातान्हात, दमट वातावरणात काटेवाडीतील नितीन भिसे पत्नीसह या बँकेत किराणा दुकानासाठी कर्ज मिळेल का याची विचारणा करण्यासाठी आलेला होता. हा खातेदार आतापर्यंत पाच ते सहा वेळा बँकेच्या दारापर्यंत आलेला आहे,. पुढील आठवड्यात या, दोन दिवसांनी या अशा उत्तरांनी हे दांपत्य वैतागून गेले होते. अर्ज सोडाच, मात्र कर्ज मिळेल की नाही हे देखील बँकेचे अधिकारी, कर्मचारी सांगत नाहीत. धड नीट बोलत नाहीत, याच बँकेत खाते असल्याने इतर ठिकाणी विचारताही येत नाही असे नितीन यांनी उद्वेगाने सांगितले.
भवानीनगर येथील शाळेतील शिक्षिका व लघु उद्योजिका देखील बँकेच्या या बेभरवशी कारभाराने नाराज होत्या. त्यांनी सांगितले की, माहिती देखील देत नाहीत. आतमध्ये अधिकाऱ्यांना भेटता येत नाही, अधिकाऱ्यांशी जे बोलायचे, ते सुरक्षारक्षकाशी बोलावे लागते, त्याला पढवून दिल्याप्रमाणे तो फक्त टाळण्याचे काम इमाने इतबारे करतो असे त्यांनी सांगितले.
आणखी एक बचत गटाच्या अध्यक्षा गेल्या चार दिवसांपासून फक्त बचत गटाचे पैसे भरण्यासाठी दररोज येतात. विनाकारण त्यांना हेलपाटे मारायला लावले जात असल्याची त्यांची तक्रार होती. त्यापेक्षाही एका खातेदाराने तर फक्त पासबुक भरून घ्यायचे आहे, तर तेही भरून दिले जात नाही असे सांगितले. या बँकामधील अधिकारी कधी कोणाला भेटतच नाहीत अशीच स्थिती एका व्यावसायिकाने सांगितली.
याचा व्हिडीओ महान्यूज लाईव्ह फेसबुक वर पहा










