वालचंदनगर पोलिस ठाण्यातील प्रकार, महिलेवर कारवाईचे आदेश
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पतीने हातउसने घेतलेले पैसे मिळत नाहीत, म्हणून माझ्यावर आरोपीने वारंवार बलात्कार केला अशी फिर्याद देणाऱ्या महिलेने गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच बलात्कार झाला नाही, फक्त पैशाचा तगादा होता असे नवे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आणि न्यायालयाने आरोपीला जामीन तर दिलाच, मात्र या महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करा असा आदेश दिला.
वालचंदनगर पोलिस ठाण्यात लाकडीनजिकच्या एका महिलेने आपल्यावर वारंवार बलात्कार झाल्याची फिर्याद दिली होती. तसेच ६ जून रोजी पती घरी नसताना आरोपीने पैसे देत नाही, तर शरीरसंबंध ठेव असे सांगत बलात्कार केला अशी फिर्याद या महिलेने दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्याचवेळी संशयित आरोपीने बारामती सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. या दरम्यान संबंधित महिलेने वालचंदनगर पोलिसांना पुन्हा नव्याने प्रतिज्ञापत्र देत आपल्यावर कधीच बलात्कार झाला नाही, फक्त वारंवार पैशाचा तगादा होत असल्याने आपण बलात्काराची फिर्याद दिली असे प्रतिज्ञापत्र दिले आणि या गुन्ह्याने वेगळे वळण घेतले.
बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश आर.आर. राठी यांच्यासमोर या जामीनाची सुनावणी सुरू असताना सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी संबंधित फिर्यादी महिलेचे मूळ जबाब व नवे प्रतिज्ञापत्र मांडून विसंगती न्यायालयासमोर आणली. संबंधित महिलेने खोटा गुन्हा दाखल करून पोलिस यंत्रणा व न्याय यंत्रणेचा वेळ व पैसा खर्च केल्याचा दावा त्यांनी केला.
त्यावर दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी सरकारी वकीलांचे म्हणणे ग्राह्य धरून या घटनेत फिर्यादी महिलेने न्याय यंत्रणा व पोलिस यंत्रणेचा वेळ खर्ची घातला व आरोपीला न्यायासाठी झगडावे लागल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला व संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाईचे आदेश वालचंदनगर पोलिसांना दिले.










