टिम महान्यूज लाईव्ह
जगातील सर्वात स्वयंशिस्तीचा सोहळा म्हणून जगभर जो वर्णिला जातो, तो भागवत संप्रदायाचा वारीचा पालखी सोहळा. यंदाच्या कोरोनाने मर्यादा आणल्या असल्या तरी वैष्णवांचा उत्साह काही मर्यादेत आणता येत नाही..त्यामुळेच आज अशाही वातावरणात टाळमृदुंगाचा गजर होताच आपोआप पुंडलीक वरदाचा जयघोष झाला आणि आषाढी एकादशीसाठी जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ झाल्या..मनी तुकोबारायांची सोबत यंदा करता येणार नाही याची अनामिक हूरहूर मात्र प्रत्येक वारकऱ्याने आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडवत तुकोबारायांना भावपूर्ण निरोप दिला.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देवसंस्थांनांचे पदाधिकारी व महत्वाच्या वारकऱ्यांच्या २० जणांच्या पथकासमवेत शिवनेरी बसमधून या पादुका पंढरीच्या वाटेला मार्गस्थ झाल्या आहेत. उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या पादुका पंढरीला पोचणार असून यावेळचाही वारीचा सोहळा वैष्णवांनी जगाने अभिवादन करावे अशा स्वयंशिस्तीने पार पाडला..मनात विठोबाच्या मुखदर्शनाची आस असूनही जगाच्या शांती, समृध्दीचे पसायदान मागण्याची परंपरा राखणाऱ्या वारकरी समुदायाने हा कोरोनाचा महामारीचा काळ लक्षात घेत भेदाभेद नसली तरी अमंगळ घडू नये म्हणून स्वतःच्या भक्तीच्या उत्साहाला आवर घालत जगाला संदेश दिला.










