
अमूलशी करारामुळे फायदा झाल्याचा दूधगंगा चा दावा
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर येथील दुधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाकडे दूध घालणाऱ्या शेतकऱ्याच्या म्हशीच्या दुधास 25 जून रोजी चक्क 62 रुपये प्रतिलिटर एवढा दर मिळाला आहे. 9.5 फँटचे हे दुध आणि त्याचा दरही विक्रमीच ठरला आहे.
दूधगंगा संघाकडून गाईच्या दुधाला 25 रुपये प्रमाणे प्रतिलिटरला हमीभाव दिला जात असून अनेक शेतकऱ्यांना दुधाच्या गुणवत्तेनुसार 26 – 27 रुपये असाही दर मिळाल्याचा दावा दूधगंगाच्या वतीने करण्यात आला.
दूधगंगा दूध संघाचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूधगंगा संघाने अमूल बरोबर नुकताच करार केला. अमूल नेही दूध संघाचे संकलन 8 जून पासून सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे 10 दिवसाला बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत. दूधगंगा संघ हा इंदापूर तालुक्यातील एकमेव सहकारी दुध संघ आहे. या सहकारी दुध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव व त्यापेक्षा जादा दर मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी समाधानी राहतील व शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये अमूलच्या सहकार्याने पशुखाद्य, वैद्यकीय सुविधा आदी अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.










