आरोग्य विभागासह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे नगराध्यक्षांनी केले कौतुक..
सुरेश मिसाळ: महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर बाह्यवळणावरील लकी हॉटेल परिसरात आढळून आलेली 45 वर्षीय महिला आज कोरोनामुक्त झाली. इंदापूर कोव्हिड सेंटरमधून बाहेर पडताना नगराध्यक्षा अंकिता शहा व उपस्थितांनी कोरोनामुक्त महिलेवर पुष्पवर्षाव करीत अभिनंदन केले. आज शुक्रवारी त्या महिलेस घरी सोडण्यात आले.आजच्या स्थितीला इंदापूर कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण नाही.त्यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या स्टाफने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
आज घरी सोडण्यात आलेल्या सदर महिलेस 17 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दि.17 जून पासून आज दि.26 जून पर्यंय इंदापूर आरोग्य विभागाची टीम या रुग्णावर उपचार करित होती.यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा,मुख्याधिकारी डाॅ.प्रदीप ठेंगल ,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, गटनेते कैलास कदम, वैद्यकिय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे, डाॅ.सुहास शेळके, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे,दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आजपर्यंत इंदापूर तालुक्यातील 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वास्तविक पाहता यापैकी 15 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी इंदापूर आरोग्य विभागाच्या टीम ला मोठे यश आले आहे. या सर्व रुग्णांवर इंदापूर कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात आले आहेत.तर एक रुग्ण लोणी काळभोर मधील एका हाॅस्पीटल मधून कोरोनामुक्त झाला आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3 रुग्णांवर इंदापूर बाहेर उपचार सुरु आहेत.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालय असताना मात्र अतिमहत्वाच्या सुविधा व तसा स्टाफ अद्याप शासनाकडून पुरवला गेला नाही. तर कोवीड च्या गंभीर रुग्णावर उपचारासाठी पुरेसे व्हेंटीलेटर देखील नाहीत. मात्र अशा परिस्थितीत इंदापूर आरोग्य विभागाच्या डाॅक्टरांच्या टीम ने मात्र प्रयत्न करीत 15 व्यक्तींना कोरोनामुक्त केले आहे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी डाॅक्टरांची कामगिरी अतिशय चांगली असल्याचे सांगत नगरपालिकेचे नियोजन उत्तम असल्याचे सांगितले.नगराध्यक्षांसह नगरपालिकेचे कौतुकही त्यांनी केले.
अंकिता शहा – नगराध्यक्षा, इंदापूर : आज इंदापूर शहर पुर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे. कोरोनाच्या संकटात आरोग्य विभाग व नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले याचा आपणाला अभिमान वाटत आहे. मात्र भविष्यात इंदापूर शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन आपले आरोग्य जपावे.शिवाय नागरिकांनी फिजीकल डिस्टंन्सींग कटाक्षाने पाळावे.










