सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला निर्णय
मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक वर्षांपासून गावपातळीवर खऱ्या अर्थाने आरोग्याचं आनंददायी काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना मानधन वाढले पाहिजे, त्यांच्या मानधनातील वाढीबरोबरच त्यांना कामावर कायमस्वरूपी करण्यात यावे अशा स्वरुपाच्या मागण्या दरवर्षी सातत्याने होत आहेत, मात्र त्यांच्या पदरी निराशा पडते. मात्र आज अनपेक्षितरीत्या सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 2 हजार व 3 हजार रुपये कायमस्वरूपी मानधनवाढीचा निर्णय जाहीर केल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांना आशा स्वयंसेविकांची खूप दिवसांपासूनची मागणी असून त्यामध्ये लक्ष घालावे व त्यांच्या कायमस्वरूपी मानधनात वाढ करावी अशा स्वरूपाची मागणी केली होती. सध्याच्या कोरोनाच्या महामारी च्या काळातही राज्यातील सर्व covid-19 केअर सेंटर पासून ते कोरणा रुग्णालयापर्यंत आशा स्वयंसेविका यांनी खूप मोठी जबाबदारी उचलली व कोरोना च्या लढाईत फार मोलाचे योगदान दिले या सर्वांची दखल घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने तसेच सध्याच्याकोरोना महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्यावर मोठाच आर्थिक भार असतानादेखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून तशी तरतूद करून दिली. राज्य सरकारने दिलेल्या या मंजुरीबद्दल व तरतूदीबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
राजेश टोपे म्हणाले, ‘मानधनातली ही वाढ जाहीर करत असताना मी माझ्या या आशाताईंचे आवर्जून ऋणनिर्देश करत आहे. या आव्हानात्मक कोविड महामारीच्या काळात महाराष्ट्रातल्या ६५ हजार आशाताईंनी अखंडितपणे आपलं काम सुरू ठेवलं होतं. महाराष्ट्रातील सर्व खेडयापाडयांमध्ये तसेच नागरीकरण झालेल्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोविड-१९ बाधेच्या संक्रमणामुळे संशयित असलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यात सरकार यशस्वी झाले. आशा स्वयंसेविका यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सर्वेक्षणांमध्ये खूप मोठे योगदान दिले हे योगदान न घाबरता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून दिल्याने सरकारला मोठा हातभार लाभला. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य, प्रसूती, लसीकरण, शालेय पोषण आहार, माहितीचे संकलन अशी अनेक कामे या काळात आशा स्वयंसेविकांनी न थकता अविरतपणे केले.’












अतिशय सुंदर निर्णय !!!
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत
अतिशय सुंदर निर्णय !!!
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत !