
फक्त एका शब्दाने केली कमाल, गावकरी झाले बेहाल
बारामती : महान्यूज लाईव्ह
हॅलो रूई हॉस्पिटल? तुम्ही पाठवलेला पेशंट पॉझिटिव आहे! बस्स.. पुण्यातील ससून मधून आलेल्या या निरोपानंतर बुधवारी रात्री बारामतीला आरोग्य खाते कामाला लागले.. पण अहवालाची प्रतीक्षा होती.. तोपर्यंत नारोळीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याची चर्चा तर सुरू झाली, पण आज सकाळी अहवाल आला आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी डोळे विस्फारले, कारण तो रुग्ण तर कोरोना निगेटीव्ह होता.. मग रात्री का पॉझिटिव्ह माहिती कोणी दिली? मग आरोग्य खात्याने माहिती काढली आणि कोरोना निगेटिव्ह असलेला हा पेशंट प्रत्यक्षात रक्त गटांमध्ये ए पॉझिटिव्ह होता, फक्त या एका पॉझिटिव्हनेस शब्दाने सारे गाव मात्र रात्रभर निगेटिव्ह बनले होते..!!
एका रक्त गटाने बारामती तालुक्यात अनेक गावांची कशी रात्री झोप उडवली ही गंमतीदार कहाणी आज बारामती तालुक्यात साऱ्यांची करमणूक करून गेली.. अर्थात पुण्याच्या डॉक्टरांनी देखील खातरजमा करून सांगायला पाहिजे हा भाग अलाहिदा, मात्र घाई – गडबडीत नसलेला कोरोना गावाने तालुक्यात रात्रभर चर्चेत ठेवला..!!
ज्या दिवसापासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागले त्या दिवसापासून त्या- त्या भागांमध्ये कोरोनाची भिती घेतली जाते.. एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव्ह आला की सगळी धांदल उडते..ती प्रशासनाचीही आणि स्थानिक लोकांचीही! बुधवारी रात्री मात्र बारामतीच्या आरोग्य प्रशासनाची धांदल उडाली, ती तालुक्यातील नारोळी येथील एक पेशंट पॉझिटिव्ह आला म्हणून…! अर्थात हा रुग्ण अगोदर रुई येथे उपचारासाठी दाखल झाला होता, त्यानंतर त्यास पुणे येथे पाठवण्यात आले. त्याच्याविषयीच्या लक्षणांची थोडीफार माहिती डॉक्टरांना होती, त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल येत नाही, तोपर्यंत प्रशासन शांत राहिले.. आज सकाळी या रुग्णाचा अहवाल हा कोरोना निगेटिव्ह आला, मग डॉक्टरांनी रात्रीच्या निरोपाबद्दल खातरजमा करण्यास सुरुवात केली, तेव्हा याच अहवालामध्ये कोरोना निगेटिव्ह व त्याच्याखाली त्याच्या रक्त गटामध्ये मात्र पॉझिटिव्ह हा शब्द होता…!! तोच पॉझिटिव्ह शब्द तेथील डॉक्टरने त्यांना सांगितला होता.. आणि ध चा मा बारामती तालुक्यात झाला..
उगीच नाही, मध्यंतरी … सारे काही पॉझिटिव्ह होईल, तुमचा फक्त कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पाहिजे.. अशी एक स्लोगन तयार झाली होती!!











अवघडयं ! …
अवघडयं ! …
#मराठी_माणूस