इंदापूर दूधगंगा संघावर अवसायानाची अंतरिम कारवाई : संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मात्र दूध खरेदी सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण
सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : दूधगंगा संघाने अमूल बरोबर पाच वर्षाचा दूध खरेदीचा करार केल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी जाहीर केले खरे, मात्र सहकारातील कॅबिनेट मंत्री राहीलेल्या हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या जुन्या खात्यानेच दणका दिला आहे. सहकार खात्याचे सहनिबंधक सुनील शिरापूरकर त्यांनी 16 जून च्या तारखेने आदेश काढत इंदापूर दूध संघावर अवसायनाची कारवाई अंतरिम करीत अवसायकाची नेमणूक केली आहे, इंदापूर तालुक्यातील शह-काटशहाच्या राजकारणात साहजिकच अमुल ला इंदापूरचे दरवाजे उघडे राहणार का याबाबतचा संभ्रम मात्र कायम राहीला आहे. मात्र दूधगंगा संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांनी हा खोडसाळपणा आहे जाणीवपूर्वक केलेले कारस्थान असून आम्ही कोर्टकचेर्यांद्वारे उत्तर देऊ आणि अमूलची दूध खरेदी सुरूच राहील, शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
इंदापुरात गेल्या काही दिवसांपासून वनखात्याला लक्ष करीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अतिक्रमण धारकांच्या खांद्यावरून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर नेम धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणावरून सुरु असलेलं नाराजीचं नाट्य संपते न संपते तोच हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन 8 जून पासून दूधगंगा संघाकडून अमूल दररोज दूध संकलन करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लागलीच अवसायनाची अंतरिम आदेश मिळाला आहे.
अर्थात अमूल इंदापूर तालुक्यातील दुधाच्या स्पर्धेत उतरणार हे जाहीर होताच इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळाला होता. अमूलची राज्यातील वर्चस्वाची लढाई लक्षात घेता अमूल या ठिकाणी देखील राज्यातील नव्हे तर देशातील अग्रगण्य असलेल्या सोनाई दूध संघाला देखील दूध घरामध्ये मात देईल अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती. मात्र हे औटघटकेचे राजकारण ठरणार काय असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी दूधगंगा संघाला अवसायनात काढण्यासाठी सहकार खात्याकडून भाजपच्या काळामध्ये प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र त्यावेळी दूधगंगा संघाने संकलन सुरू असल्याबाबत पुरावे देत ही अवसायनाची येण्याची प्रक्रिया थांबवली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात भाजप सत्तेवर येण्याऐवजी महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय सत्तेत राहण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. त्यातच इंदापूरच्या लोकप्रतिनिधीला मंत्रिपद मिळाल्याने आणखीच भर पडली. मागील महिन्यापासून हर्षवर्धन पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत, मात्र त्यांच्या या उत्साहाला मिठाचा खडा महाविकासआघाडी कडून टाकण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अमूल च्या माध्यमातून राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या दूध संघांना शह देण्याचा प्रयत्न करताच 16 जून रोजी सहकार खात्याने अवसायनाची प्रक्रिया पूर्ण केली, त्याचा अंतरिम आदेश बजावून एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे, यापूर्वी दूधगंगा संघाने दिलेले खुलासे समाधानकारक नसल्याने अंतरिम आदेश बजावत असल्याची नोटीस शिरापूरकर यांनी दिली आहे. दरम्यान जे पी गावडे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करत असल्याचेही जाहीर केले आहे.
सहकाराचे माजी मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील आणि त्यांचा भाजप या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल आणि आता अशाही परिस्थितीमध्ये अमूल इंदापुरात येणार का त्याचेसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमूलच्या येण्याने इंदापुरात आर्थिकच नव्हे तर राजकीय बदल सुद्धा अपेक्षित होते, त्या पार्श्वभूमीवर या बदलत्या राजकारणाचा हर्षवर्धन पाटील कसा सामना करतात हे काळ ठरवेल.
मंगेश पाटील अध्यक्ष दुधगंगा सहकारी दूध संघ – अमूल च्या येण्याने दूध उत्पादकांना हमीभाव मिळतोय. चांगल्या दराची खात्री निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा खोडसाळपणा होणार याची खात्री होती. अपेक्षेनुसार हे कारस्थान झाले असले तरी देखील यापूर्वीही दूधगंगा संघावर कारवाईचे प्रयत्न झाले परंतु आम्ही त्यांना उत्तर दिले होते. आताही आम्ही उत्तर देऊ. त्याचबरोबर प्रसंगी आम्ही कोर्टात देखील दाद मागू, परंतु कोणत्याही परिस्थितीत अमूलची दूध खरेदी सुरू राहील आणि दूध उत्पादकांना चांगले दिवस दाखवण्याचा आमचा प्रयत्न ही यशस्वी होईल. त्याबाबत कोणी काळजी करण्याचे कारण नाही. तसेच दूध उत्पादकांनी देखील कोणाचाही भूलथापांना बळी पडू नये. ही अंतरिम नोटीस असून त्याला आम्ही योग्य उत्तर देऊ.










