दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव मधील डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याने दौंड तालुक्याची चिंता वाढू लागली आहे. केडगावच्या परिसरातील नागरिकांमध्ये या कोरोना रुग्णामुळे चिंतेचे वातावरण आहे. अर्थात संबंधित डॉक्टरांना कोणतीही लक्षणे नाहीत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. केडगाव स्टेशन येथील हे डॉक्टर कोरोनाबाधित असले तरी या डॉक्टरांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाही व रूग्णालयातही रूग्णांशी संपर्क नाही, मात्र केवळ शंका म्हणून या डॉक्टरांनी लोणीकाळभोर येथील खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी केली, तेव्हा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान या खासगी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोनाबाधित असला तरीही या डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबातील व रूग्णालयातील संपर्कातील सहा जणांची कोरोनाची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान आता दौंडच्या ग्रामीण भागात दररोज कोठे ना कोठे कोरोनाचे रुग्ण दिसू लागल्याने नागरीकांनी मास्क वापरावे, साबणाने हाथ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा आणि योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन तहसीलदार संजय पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी केले आहे.











