राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश सावंत यांनी दिली होती फिर्याद
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेसबुक वरून बदनामीकारक पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी लातूर येथील योगेश रमाकांत स्वामी यास वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे सोशल मिडीयाचे कार्यकर्ते योगेश राजेंद्र सावंत यांनी वालचंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
लातूर येथील योगेश रमाकांत स्वामी या फेसबुक अकाउंट धारकाने त्याच्या फेसबुक अकाउंट वरती तीन वेगवेळ्या पोस्ट करून त्यामध्ये श्री. शरद पवार यांचे फोटो मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने व बदनामी होईल अशा पद्धतीने पोस्ट केले होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारच्या पोस्ट टाकत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश सावंत यांनी स्वामी याच्या विरोधात वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
त्यावरून पोलिसांनी तत्परता दाखवत लातूर येथून योगेश स्वामी यास ताब्यात घेतले व अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस करीत आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थितीवरून भाजपशी संबंधित कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करताना बदनामीकारक विधाने व बदनामीकारक पोस्ट करत आहेत, यापुढे त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा योगेश सावंत यांनी दिला आहे.










